Friday, July 8, 2011

प्रकरण बारावे - शील

शील म्हणजे विशुध्दीमार्ग. या विशुधीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे.

पंचशीलाबाबत एक गोष्ट अशी आहे की, एकदा एक भिक्खु एका गांवावरुन दुसर्‍या गांवला जात असतांना रात्र होते. म्हणूने ते त्या गांवच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवार्‍याची व्यवस्था करायाला विनंती करतात. तेव्हा तो गृहस्थ आनंदीत होऊन भिक्खुंची राहण्याची व्यवस्था करतात. सकाळी उठून भिक्खु त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामूळे तुझे कल्याण होईल असे सांगतात. परंतू त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामूळे तो मनातल्या मनात विचार करतो की, हे शील पाळणे मला शक्य होणार नाही. म्हणून जस-जसे भिक्खु एक-एक शील समजाउन सांगतात तस-तसे तो गृहस्थ शीलाचे पालन करण्यास नकार देतो. त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा आहे हे सुध्दा तो गृहस्थ भिक्खूला सांगू शकत नाही. म्हणून भिक्खु म्हणतात की, पांचही शीले पाळता येत नसतील तर निदान चार शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान तीन शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान दोन शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान एक शील तरी पाळा. गृहस्थाला वाटते की, एखादा शील तरी पाळायला काय हरकत आहे, म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, मी खोटे बोलणार नाही, हे शील पाळायला तयार आहे. भिक्खु उपदेश करुन निघून जातात. रात्रीला नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो. त्याचवेळेस त्या राज्याचा राजा सुध्दा वेशांतर करुन राजवाडयाच्या बाहेर येतो. तेव्हा त्या राज्याला तो गृहस्थ दिसतो. त्या गृहस्थाला राजा विचारतो, कोण आहेस ? काय करतो ? त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामूळे त्याने सांगितले, मी चोर आहे. राजाच्या तिजोरितील हिरे मला चोरायचे आहे. तेव्हा त्या राजाला त्या़च्या खरे बोलण्याबद्दल कौतूक वाटले. राजाने त्याला सांगितले, तू तर खरा बोललास. मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील. म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे. म्हणजे मी राजाला सांगणार नाही. या गोष्टीला तो चोर तयार झाला. तो राजवाडयाच्या आंत जाऊन हिर्‍याचा शोध घेतो. तेव्हा त्याला असे दिसले की, त्या तिजोरीत फक्‍त तिनच हिरे आहेत. यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्‍तीला कसे देणार असा प्रश्‍न पडल्यामूळे तो एक हिरा तसाच ठेऊन दोन हिरे सोबत घेऊन राजवाडयाबाहेर पडतो. बाहेरच्या व्यक्‍तीला त्या दोन पैकी एक हिरा देतो. त्या व्यक्‍तीने विचारल्यामूळे पत्ता सांगून तो चोर निघून जातो.

दुसर्‍या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतात. तिजोरी पाहील्यानंतर प्रधानाला तिन पैकी फक्‍त दोन हिरे चोरीला गेल्याचे आढळते. प्रधानाला वाटते की, चोराने तिन्हिही हिरे चोरले असते. राजाला कुठे माहिती आहे की, एक हिरा चोराने तेथेच ठेऊन दोन हिरे घेऊन गेला. म्हणून तो एक हिरा स्वत:जवळ ठेवतो व राजाला सांगतो की, तिजोरितील तिन्हिही हिरे चोरीला गेले आहेत. राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा लक्षात आला. त्याचवेळेस राजा दरबार भरवतो. हिरे चोरणार्‍या त्या चोराला राजा दरबारात बोलावीतो. चोराच्या लक्षात येते की, रात्रीचा जो व्यक्‍ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामूळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार! आपण भिक्खुमूळे फसल्या गेलो याचे त्याला दु:ख झाले. राजाने प्रधानाने केलेल्या खोटेपणा बद्दल प्रधानाला काढून टाकले व चोराच्या खर्‍यापणाबद्दल त्या चोराला प्रधान बनवीले. राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले. भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामूळे मला प्रधानपद मिळते. मी जर पांचही शीलाचे पालन केले असते तर मी कुठल्या कुठे जाऊन पोहचलो असतो. एवढी ताकद या पंचशीला मध्ये आहे याची त्याला जानिव झाली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, भगवान बुध्द म्हणतात, प्रत्येक माणसाने शीलाची ही पांच तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पांच तत्वे किवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात पतितांचे दोन वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहेत असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्यांच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्‍न करित असतो. कारण त्याला आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. जीवनाचा आदर्श म्हणून हीच तत्वे आदर्श आहेत. ही तत्वे व्यक्‍तीच्या हितासाठी आणि सामाजिक हित साधणारी आहेत.

शील म्हणजे नितिमत्ता. जो नितिवान आहे, जो नितिने चालतो, बोलतो, वागतो त्याला आपण शीलवान म्हणतो. शील म्हणजे मानसाच्या मनाची अशी घडण की ज्यामुळे मनुष्य पापकर्मापासुन, अकुशल कर्मापासुन दुर राहतो. तो कुशल कर्म करतो.

भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेत्र्यांशीव्या गाथेत म्हणतात,

सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !

सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!

याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच बुध्दाची शिकवण आहे.

अकुशल कर्म

अकुशल कर्म तीन प्रकाराचे आहेत. १) कायिक, २) वाचिक व ३) मानसिक

कायिक अकुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) हिंसा करणे, २) चोरी करणे व ३) व्यभिचार करणे.

वाचिक अकुशल कर्मात पुढिल प्रमाणे चार कर्मे येतात. १) खोटे बोलणे, २) चुगली-चहाडी करणे, दुसर्‍याची निंदा करणे ३) शिव्या देणे, कटू बोलणे व ४) व्यर्थ, बाष्कळ बडबड करणे.

मानसिक अकुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) लोभ करणे, २) द्वेष करणे व ३) मोह, मिथ्या दृष्टी बाळगणे. अशा प्रकारे दहा अकुशल कर्मे आहेत.

तसेच कुशल कर्म तीन प्रकाराचे आहेत. १) कायिक, २) वाचिक व ३) मानसिक

कायिक कुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) अहिंसा म्हणजे मैत्री व करुणा, २) अचोरी म्हणजे दान करणे व ३) अव्यभिचार म्हणजे संतुष्ट राहणे

वाचिक कुशल कर्मात पुढिल प्रमाणे चार कर्मे येतात. १) सत्य बोलणे, २) चुगली-चहाडी न करणे, दुसर्‍याची निंदा न करणे ३) शिव्या न देणे, कटू न बोलणे, प्रिय बोलणे व ४) व्यर्थ, बाष्कळ बडबड न करणे, यथायोग्य बोलणे

मानसिक कुशल कर्मात पुढिल प्रमाणे तीन कर्मे येतात. १) अलोभ करणे, २) अद्वेष करणे व ३) अमोह असणे, मिथ्या दृष्टी न बाळगणे. अशा प्रकारे दहा कुशल कर्मे आहेत.

कर्म कोणत्या हेतूने केले, त्यावर ते कर्म कुशल आहे की अकुशल आहे ते अवलंबून आहे. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करीत असतांना एखादा रोगी मरण पावला तर त्याला अकुशल कर्म म्हटल्या जाणार नाही. परंतु एखाद्यांनी जर कुणाच्या पोटात सुरा खुपसून त्याला मारले असेल तर ते अकुशल कर्म होईल.

निंदा न करणे, नेहमी जागृत राहणे, रात्रंदिवस मनाला नियंत्रणात ठेवणे, निर्वाणासाठी नेहमी प्रयत्‍नशील राहणे, वाणीचा संयम बाळगणे ईत्यादी कुशल कर्मे धम्मपदात सांगितले आहे.

कुशल कर्माबाबत भगवान बुध्द धम्मपदाच्या त्रेपन्नाव्या गाथेत म्हणतात-

यथापि पुप्फरासिम्हा कबिरा मालागुणे बहूं।

एवं जातेन मच्चेन कत्तब्बं कुसलं बहुं ॥

याचा अर्थ, ज्याप्रामाणे कोणी पुष्पराशीतून माळांचे सर (हार) करावेत, त्याप्रमाणे जगात जन्माला आलेल्या प्राण्यांनी अनेक कुशल कर्मे करावीत.

तसेच धम्मपदात पन्नासाव्या गाथेत सांगितले आहे की-

न परेसं विलोमानि न परेसं कताकतं।

अत्तनो’च अवेक्खेय्य कतानि अकतानि च ॥

याचा अर्थ, ना दुसर्‍याच्या दोषाला, ना दुसर्‍याच्या कृत-अकृत्याला बघावे (माणसाने फक्त) आपल्याच कृत-अकृत्याला बघावे.

अष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे मार्ग शीलामध्ये येतात.

१) सम्यक वाचा

अष्टांगिक मार्गातील तिसरा मार्ग सम्यक वाचा हा आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. १) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. २) असत्य बोलू नये. ३) माणसाने दुसर्‍याविषयी वाईट बोलू नये. ४) माणसाने दुसर्‍याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत व्हावे. ५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये ६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे असे भगवान बुध्दांनी ‘सुत्त निपातात व दीघ निकायात’ सांगितले आहे.

सम्यक वाचा म्हणजेच सम्यक वाणी. वाणी ही चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. भांडण, तंटा वादावादी हे वाईट वाणीमूळे तर प्रेम, ममता चांगल्या वाणीमूळे ऊत्पन्न होत असते. प्रबोधन, जागृती हे वाणीमूळेच शक्य आहे. म्हणून जीवन जगत असतांना वाणी हे महत्वाचे घटक आहे.

‘धम्मपदात’ वाणीचे महत्व सांगितले आहे. मन हे सर्व धर्माचे पूर्वगामी अग्रणी आहे. मन हे श्रेष्ठमय आहे, मनोमय आहे. जो कोणी दुष्ट मनाने बोलतो किवा कर्म करतो त्याच्या मागे गाडी ओढणार्‍या बैलाच्या पायाच्या मागे ज्याप्रमाणे गाडीचे चाके जातात, त्याचप्रमाणे दु:ख जाते. त्याचप्रमाणे जो कोणी प्रसन्न मनाने बोलतो किवा कर्म करतो, त्याच्यामागे सुख हे कधीही साथ न सोडणार्‍या छायेप्रमाणे मागे मागे जाते. कोणालाही कठोर बोलू नये, रागावू नये. असे बोलण्याने दुसरेही तुम्हाला तसेच बोलतील. नेहमी सत्य बोलावे. कोणावरही क्रोधीत होऊ नये. वाणी संयत ठेवावी. वाणीचे वाईट आचरण त्यागून वाचेने चांगले आचरण करावे. कोणासोबत उध्दट्पणे बोलू नये. स्वत:ची आत्मस्‍तुती करु नये. दुसर्‍यांचा तिरस्कार करु नये. कुणालाही शिव्याश्याप देऊ नये. ईतरांना त्रास होणार नाही अशी वाणीने कृती करावी. मनाला आवडणारी, हृदयाला भिडणारे व कानाला मधुर वाटणारी वाणी बोलावे. अशी शिकवण भगवान बुध्दांनी दिली आहे.

कठोर वाणीचे, मिथ्या वाणीचे जे वाईट परिणाम आहेत, ते भगवान बुध्दांनी ‘अंगुत्तरनिकायात’ सांगितले, काही काही व्यक्‍ती क्रोधी स्वभावाचे, अशांत चित्ताचे, थोडेही बोलले तर रागावणारे, चिडचिडे, कठोर हृदय होऊन विरोधी होतात. क्रोध, द्वेष आणि असंतोष प्रगट करतात. ज्याप्रमाणे जुन्या व्रणावर जर लाकूड किंवा काही लागले तर रक्‍त वाहू लागते, त्याचप्रमाणे काही व्यक्‍ती क्रोधी, अशांत चित्ताचे रागावणारे, चिडचिडे व क्रोध, द्वेष आणि असंतोष प्रगट करणारे असतात. अशाप्रकारच्या व्यक्‍ती उपेक्षा करण्यायोग्य असतात. त्यांचे अनुकरण करु नये. सेवा करु नये. आदर करु नये. कारण अशी व्यक्‍ती माझा अपमान करु शकते. अपशब्द म्हणू शकते. मला अनर्थ व हानी पोहचवू शकते. म्हणून अशा प्रकारच्या व्यक्‍तीच्या प्रती उपेक्षा करावी.त्याचे अनुसरुन व आदर करु नये. भगवान बुध्द भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, जर कोणी माझी (बुध्दाची), धम्माची व संघाची निंदा करतील तेव्हा तुम्ही त्यांचेशी वैर, असंतोष आणि आपल्या मनात राग धरु नये. कुपित किंवा खिन्न होऊ नये. त्यामुळे तुमचीच हानी होईल. राग अथवा खिन्न झाल्यामुळे ती गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे ते कळणार नाही. म्हणून सत्य किंवा असत्याला शोधले पाहिजे.

तसेच कोणी प्रशंसा करीत असेल तर तेव्हादेखील आनंदीत, प्रसन्न अथवा हर्षोत्‍साहित होऊ नका. त्यामध्ये सुध्दा तुमचीच हानी आहे. व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्व हे त्याच्या वाणीवरुन, बोलण्यावरुन कळून येते. बोलणारी व्यक्‍ती आपल्या चांगल्या अथवा वाईट बोलाण्याने दुसर्‍याशी चागले अथवा वाईट संबंध प्रस्थापित होतात. बुध्दांच्या वचनात व्यर्थ बडबड राहत नव्हती. ते असंयत गोष्टी मानत नव्हते. वचनाने त्यांनी अहित गोष्टी दूर सारल्यात आणि बहुजनांच्याच हिताच्या गोष्टी सांगितल्या. म्हणून ‘सम्यक वाचा’ हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. तो जीवनात उतरविण्याचा प्रत्येकांनी प्रयत्‍न करायला पाहिजे.

२) सम्यक कर्मांत

अष्टांगिक मार्गातील चवथा मार्ग सम्यक कर्मांत हा आहे. जीवनाच्या नियमांशी सुसंगत वर्तन करणे, दुसर्‍यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय.

‘सुत्तनिपातात’ भगवान बुध्दांनी सांगितले आहे की, ‘कर्माने जग चालते. प्राणी कर्माने जगतात. चालण्याकरीता रथ ज्याप्रमाणे अणीवर अवलंबून असतो तसे प्राणी कर्मबंधनावर अवलंबून असतात.’ याचा अर्थ संसाराचा नियंत्रक कोणी ईश्वर नसून व्यक्‍तीचे कर्म आहे.’

वैदिक ब्राम्हणी धर्म किंवा अन्य धर्म मनुष्याला यशाची प्राप्‍ती करण्यासाठी ईश्वराचा व परमात्मा यांचा वाटा असतो असे सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दांने असे काही न सांगता जे काही यश प्राप्‍त होते ते व्यक्‍तीच्या कर्माने होत असते. कर्माला महत्वाचे स्थान आहे. चांगले किंवा वाईट हे जे परिणाम आहेत ते व्यक्‍तीच्या कर्मावर अवलंबून असते.

माणसाच्या हातून चांगले अथवा वाईट कर्म घडत असते त्याचे मुळ मनाच्या चेतनेमध्ये असते. म्हणजेच त्याचे चित्त अथवा मन हे केंद्रवर्ती असते आणि म्हणून सम्यक कर्मांताकरिता मनाला संयमित करणे महत्वाचे आहे. मानवी मन चंचल, चपळ, अनियंत्रित असते. ज्याप्रमाणे बाणाला सरळ करतो त्याप्रमाणे मेघावी (बुध्दीमान) पुरुष आपल्या चित्ताला सरळ करतो. एक शत्रू आपल्या शत्रूचे आणि एक वैरी आपल्या वैर्‍याचे जितके नुकसान करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान वाईट मार्गावर लागलेले चित्त करीत असते. आई-वडील, नातेवाईक जेवढे चांगले करु शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा चांगल्या मार्गावर लागलेले चित्त करीत असते. म्हणुन सम्यक कर्म करण्यासाठी चित्त सुध्दा सम्यक असायला पाहिजे. म्हणजेच सम्यक कर्मांतचे मुळ हे चित्तच आहे. धम्मपदातील बालवग्गोमध्ये मुर्खाबरोबर संगती करण्याचे दुष्परिणाम आणि चांगल्या बरोबर मैत्रीचे सुपरिणाम माणसाला भोगावे लागतात असे सांगितले आहे. म्हणून जगामध्ये वावरत असतांना जर स्वत:पेक्षा चांगले अथवा स्वत:सारखे सोबती मिळाले नाही तर दृढतेने एकट्यानेच विचरण करावे. परंतू मुर्खाशी संगत करु नये.

जसे बी पेराल तसे उगवेल असे कर्माचा सिध्दांत आहे. म्हणून व्यक्‍तीच्या मनामध्ये सदाचरणाचे, नितिमत्तेचे बीज पेरणे आवश्यक आहे तेव्हाच त्याचेकडून चांगले आचरण घडू शकेल.

धम्मपदाच्या एकोणसत्तराव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

मधुवा मञ्ञति बालो याव पापं न पच्चति।

यदा च पच्चति पापं अथ बालो दुक्खं निगच्छति ॥

याचा अर्थ, जोपर्यंत पाप कर्म फळ देत नाही तोपर्यंत मुर्ख मनुष्य त्याला मधासारखे (गोड) मानतो. परंतु जेव्हा पाप कर्म फळ देते तेव्हा त्यास दु:ख होते. म्हणजेच वाईट वागणार्‍याला जोपर्यंत वाईट वागणुकीचे फळ मिळत नाही तोपर्यंत तो तसाच वागत असतो. परंतू जेव्हा त्याला फळ मिळते तेव्हा त्याच्यावर पश्चाताप करण्याची पाळी येते.

म्हणून धम्मपदाच्या सदुसष्टाव्या गाथेमध्ये वाईट कर्माचे काय परिनाम होतात ते सांगितले -

न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति ।

यस्स अस्सुमुखो रोदं विपाकं पटिसेवति ॥

याचा अर्थ, ते कर्म करणे चांगले नव्हे की जे करुन पश्चाताप होईल, आणि ज्याचा परिणाम रडत रडत भोगावा लागेल.

तसेच धम्मपदाच्या अडुसष्टाव्या गाथेमध्ये चांगल्या कर्माचे काय परिनाम होतात ते सांगितले -

तञ्च कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति ।

यस्स पतीतो सुमनो विपाकं पटिवेवती ॥

याचा अर्थ, ते कर्म करणे चांगले आहे, जे करुन (करणार्‍याला) पश्चाताप होत नाही, आणि ज्याचा परिणाम प्रसन्न मनाने भोगावा लागतो.

मनुष्य जीवनात जे काही बरे-वाईट कर्म करेल त्याला तोच जबाबदार असतो. म्हणून ज्यांनी जीवनात शरीर, वाणी व मनाने वाईट कर्म केले असेल तर त्यांनी यापुढे तरी चांगले कर्म करावे म्हणजे त्याचे दुष्कर्म हळूहळू दुर्बल होत जाईल असे भगवान बुध्द अंगुत्तर निकायात म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे भगवान बुध्दांच्या उपदेशानूसार डाकू अंगुलीमाल यांनी वाईट कर्म सोडून भिक्खु झालेत व पुढे कुशल कर्म करुन अहर्तपदाला पोहचलेत.

म्हणून धम्मपदाच्या एकशेसत्तराव्या गाथेमध्ये पाप पुन:पुन्हा करु नये. असे भगवान बुध्द म्हणतात -

पापंञ्चे पुरिसो कयिरा न तं कयिरा पुनप्पुनं ।

न तम्हि छ्न्दं कयिराथ दुक्खो पापस्स उच्चयो ॥

याचा अर्थ, जर पाप केले तर ते पुन:पुन्हा करु नये. त्यामध्ये रममान होऊ नये. पापाचा संचय दु:खास कारणीभूत होतो.

तसेच धम्मपदाच्या एकशेसत्तराव्या गाथेमध्ये शुभ कर्मे पुन:पुन्हा करावे असे भगवान बुध्द म्हणतात

पुञ्ञञ्चे पुरिसो कयिरा कयिराथेनं पुनप्पुनं ।

तम्हि छ्न्दं कयिराथ सुखो पुञ्ञस्स उच्चयो ॥

याचा अर्थ, जर शुभ कर्मे केले तर ते पुन:पुन्हा करावे. त्यामध्ये रममान व्हावे. पुण्याचा संचय सुखास कारणीभूत होतो.

ब्राम्हणी धर्मात जन्मामुळे श्रेष्टत्व आणि कनिष्टत्व प्राप्‍त होते असे सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दांने कर्मावर श्रेष्टत्व आणि कनिष्टत्व प्राप्‍त होते असे सांगितले आहे. मनुष्यमात्रामध्ये जे दु:ख उद्‍भवते ते निर्माण होण्याचे कारण कर्मच आहे. दारुडा व्यक्‍ती दारुच्या आहारी जाऊन स्वत:च्या शरिराची, संसाराची नासाडी करीत असतो.

३) सम्यक आजीविका

अष्टांगिक मार्गातील पाचवा मार्ग सम्यक आजीविका हा आहे

सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !

सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!

याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच भगवान बुध्दाची शिकवण आहे.

धम्मपदातील या गाथेनुसार आचरण करणे हीच सम्यक आजीविका आहे

प्रत्येक व्यक्‍तीला आपला चरितार्थ चालवावयाचा असतो. परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहत. काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसर्‍यांची हानी किंवा त्यांचेवर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. यालाच सम्यक आजीविका म्हणतात.

No comments: