Friday, July 8, 2011

प्रकरण तेरावे - समाधी

समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. ज्याने सम्यक समाधी प्राप्‍त केली आहे तो ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहू शकतो. गोष्टी जसे आहेत तसे पाहणे याला बुध्द धम्मात फार महत्व आहे. गोष्टी जसे आहेत तसे सत्यस्वरुपात पाहिल्यानेच दु:ख, अनित्यता व अनात्मता ह्या तीन भगवान बुध्दाच्या महत्वाच्या सिध्दांताविषयीचा अनुभव येतो. हा अनुभव आणि ज्ञान होत असल्यानेच त्याला आपोआपच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांताप्रमाणे दु:ख नष्ट होते.

माणसाचे मन स्थिर नसते. ते सहा इन्द्रियविषयांत नेहमी रममाण झालेले असते. ‘वस्तुमात्र जसे आहेत तसे’ पाहण्यासाठी मन केंद्रित करावे लागते. अकुशल मनोवृतीचा पूर्ण निरोध करुन कुशल मनोवृतीचा विकास करणे ही बुध्द धम्माची शिकवण आहे. सम्यक समाधी साधण्यासाठी शील संपादन केले पाहिजे. शीलाशिवाय समाधीचा लाभ होत नाही.

अष्टांगिक मार्गातील सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे मार्ग समाधीमध्ये येतात.

१) सम्यक व्यायाम

अष्टांगिक मार्गातील सहावा मार्ग सम्यक व्यायाम हा आहे. सम्यक व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम होय. सम्यक व्यायामामुळे अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्‍न करता येतो. सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत. १) आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ न देणे, २) आपल्या मनात वाईट विचार आले असतील तर ते काढून टाकणे, ३) आपल्या मनात चांगले विचार येत असतील तर ते येऊ देणे व ४) आपल्या मनात चांगले विचार आले असतील तर त्याचे संवर्धन करणे, वाढ करणे. अशा प्रकारे आपल्या मनाला योग्य व्यायाम देवून आपले चित्त शुध्द करता येते. चित्त शुध्दीकरीता सम्यक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते.

अंगुत्तर निकायात चार प्रकाराचे प्रयत्‍न सांगितले आहेत. पहिला प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न न झालेले अकुशल कर्माची उत्‍पती होऊ न देण्याचा संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. दूसरा प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न झालेले अकुशल कर्माचा समुळ नाश करण्याचा संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. तिसरा प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न न झालेले कुशल कर्म उत्पन्न होण्याकरीता संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. पहिला प्रयत्‍न म्हणजे, उत्पन्न झालेले कुशल कर्माच्या अवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी, वृध्दी करण्यासाठी व विपुलतेकरीता संकल्प करुन चित्ताला तिकडे घेऊन जातो. यालाच सम्यक व्यायाम म्हटले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, मनाच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्टय असे की, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. मन हे सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूवर अंमल चालविते. त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्‍तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्‍तीचेच बनले असते.

भगवान बुध्दाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्टय असे की, आपल्यामध्ये निर्माण होणार्‍या आणि आपल्यावर बाहेरुन ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बर्‍या-वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे, ते ते मनातूनच उत्‍पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे, ते ते मनातूनच उत्‍पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणार्‍या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात. त्याचप्रमाणे अशुध्द चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दु:ख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धम्माचे सार आहे.

धम्मपदाच्या ‘यमकवग्गो’च्या पहिल्या गाथेमध्ये लिहिले आहे की-

मनोपुब्ब‍ग्‍ङ‍मा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।

ततो’नं दुक्ख्मन्वेति चक्कं’ पदं ॥

याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म (अवस्था) प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मनच मुख्य आहे, ते (धर्म) मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य मलिन मनाने बोलतो वा कार्य करतो, तेव्हा (बैलगाडीचे) चाक जसे बैलाच्या मागेमागे लागते तसेच दु:ख त्याच्या मागे लागते.

दुसर्‍या गाथेमध्ये लिहिले आहे की-

मनोपुब्ब‍ग्‍ङ‍मा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा ।

ततो’नं सुखमन्वेति छाया’व अनापयिनी ॥

याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म (अवस्था) प्रथम मनात उत्पन्न होत असतात. मनच मुख्य आहे, ते (धर्म) मनोमय आहेत. जेव्हा मनुष्य स्वच्छ मनाने बोलतो वा कार्य करतो, तेव्हा मनुष्याचा कधी साथ न सोडणार्‍या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते.

भगवान बुध्दाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्टय असे की, मनुष्याने पापकृत्य टाळावे.

त्यांच्या शिकवणीचे चवथे वैशिष्टय असे की, खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून तो धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. म्हणून मनावर चांगले संस्कार करण्यासाठी सम्यक व्यायामाची गरज आहे.

मनामध्ये चांगल्या आणि वाईट विचाराचे नेहमीच द्वंद सुरु असते. कुशल आणि अकुशल असे दोन्हिही विचार मनामध्ये उत्‍पन्न होत असतात. अकुशल विचाराला मनात उत्‍पन्न होऊ न देणे, कुशल विचाराची वाढ करणे आणि वाईट चित्ताला नष्ट करण्य़ाचा प्रयत्‍न करणे, कोणतेही वाईट कर्माकडे मनाला न वळविणे, हे मुख्य कार्य सम्यक व्यायामाचे आहे. समाधीची ही पहिली अवस्था आहे. म्हणून सम्यक व्यायाम हे अत्यंत महत्वाचे आहे. जसा बाण बनविणारा बाणाला सरळ करतो. त्याचप्रमाणे वाईट मार्गाला लागलेल्या चित्ताला कुशलतेकडे आणण्याचे महत्वाचे कार्य सम्यक व्यायामाचे आहे.

धम्मपदाच्या तेराव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

यथागारं दुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झति ।

एवं अमावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।

याचा अर्थ, योग्य प्रकारे न साकारलेल्या घरांत ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरते, त्याचप्रमाणे असंस्कारीत चित्तामध्ये राग, लोभ आदी मनोविकार शिरतात.

तसेच धम्मपदाच्या चवदाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

यथागारं सुच्छन्नं वुट्ठी समतिविज्झति ।

एवं अमावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।

याचा अर्थ, योग्य प्रकारे साकारलेल्या घरांत ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरत नाही, त्याचप्रमाणे सुसंस्कारीत चित्तामध्ये राग, लोभ आदी मनोविकार शिरत नाहीत. याकरिता मनाला संस्कारीत करण्यासाठी सम्यक व्यायामाची नितांत आवश्यकता आहे.

धम्मपदाच्या बेचाळीसव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

दिसो दिसं यन्तं कयिरा वेरी वा पन वेरिनं ।

मिच्छापणिहिंतं चित्तं पापियो’नं ततो करे ॥

याचा अर्थ, शत्रू-शत्रूचे किंवा वैरी वैर्‍याचे जेवढे नुकसान करते, त्यापेक्षा वाईट मार्गाने गेलेले चित्त मनुष्याचे जास्त नुकसान करते.

तसेच धम्मपदाच्या त्रेचाळीसव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

न तं माता पिता कयिरा अञ्‍ञे वापि च ञातका ।

सम्मापणिहितं चित्तं सेय्यसो’नं ततो करे ॥

याचा अर्थ, आई-बाप किंवा दुसरे नातेवाईक, जेवढे कल्याण करु शकत नाही, त्यापेक्षा जास्त कल्याण सन्मार्गावर असलेले चित्त करु शकते. याकरिता चित्ताला सन्मार्गावर आणण्याचे काम सम्यक व्यायाम करते.

धम्मपदाच्या तेहतीसाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

फन्दनं चपलं चित्तं दुरक्खं दुन्निवारयं ।

उजुं करोति मेघावी उसुकारो’व्तेजनं ॥

याचा अर्थ, चित्त चंचल आहे, चपळ आहे, रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण आहे. अशा चित्ताला मेघावी (बुध्दीमान) पुरुष सरळ करतो, जसा बाणकार बाणाला सरळ करतो. म्हणून चंचल चित्ताला सरळ करण्याचे काम सम्यक व्यायाम करते.

धम्मपदाच्या अडतीसाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की-

अनवट्ठितचित्तस्स सध्दम्मं अविजानतो ।

परिप्लवपसादस्स पञ्ञा न परिपूरति ॥

याचा अर्थ, ज्याचे चित्त स्थिर नाही, जो सध्दर्म जाणत नाही, ज्याचे चित्त प्रसन्न नाही, असा पुरुष प्रज्ञावान होऊ शकत नाही. म्हणून प्रज्ञावान होण्यासाठी सम्यक व्यायामाची गरज आहे.

२) सम्यक स्मृती

अष्टांगिक मार्गातील सातवा मार्ग सम्यक स्मृती हा आहे. सम्यक स्मृती म्हणजे योग्य प्रकारे स्मरण करणे, मनाची जागरुकपणा व विचारीपणा होय. जीवनामध्ये जे कार्य करावयाचे आहे ते जागरुकतेने करायचे असते, हीच स्मृती आहे. सम्यक स्मृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवते.

भगवान बुध्दांनी कामतृष्णेपासून आणि त्याच्या दुष्परिणामापासून दूर राहाण्यासाठी सम्यक स्मृतीचे महत्व सांगितले आहे. मनुष्याने सदा स्मृतीमान राहून कामतृष्णेचा त्याग करावा.

संयुक्‍त निकायात सांगितले आहे की, स्मृतिमान व्यक्‍तीचे सदा कल्याण होत असते. स्मृतीमान व्यक्‍ती सुखाच्या आधीन राहतो. असा व्यक्‍ती श्रेष्ट जीवन जगत असतो. जो स्मृतीमान असतो तो वैरापासून मुक्‍त असतो. स्मृतीचा अभ्यास करण्याने जीवनातील अत्युच्च पद म्हणजे निर्वाण प्राप्‍त करण्यास मदत होते. प्रत्येक क्षणी स्मृतीमान राहिल्याने त्याच्याकडून वाईट कृत्य घडण्याचा शक्यता फारच कमी असते. स्मृती वाईट आणि चांगले जाणत असते. तसेच स्मृती माणसांच्या विकारांना जाणत असते. तृष्णेच्या आहारी जाणारे दु:खाला बळी पडत असतात. मिथ्या आचरण, मिथ्या दृष्टी, मिथ्या वाचा, मिथ्या कर्म याबाबत स्मृती जागृत ठेऊन जीवन जगणारे सुखी व आनंदी राहत असतात.

बुध्दांचा धम्म माणसासाठी असून माणसातील विकारांना नष्ट करुन त्याला एक चांगला माणूस बनविणे हे धम्माचे ध्येय आहे. हे ध्येय तेव्हाच साध्य करता येते जेव्हा तो स्मृतिने युक्‍त असे आचरण करतो.

मज्झिम निकायमध्ये सतिपठान सुत्तामध्ये चार प्रकाराचे स्मृती सांगितल्या आहेत.

१) कायानुस्मृती, २) वेदनानुस्मृती, ३) चित्तानुस्मृती व ४) धम्मानुस्मृती

या सुत्तामध्ये भगवान बुध्द म्हणतात, ‘भिक्षूंनो, हे जे चार स्मृतीप्रस्थाने आहेत ते स्वत:च्या विशुध्दीसाठी, शोक कष्टाच्या अस्तासाठी, दु:खाला दूर करण्यासाठी, सत्याच्या प्राप्‍तीसाठी, निर्वाणाच्या प्राप्‍ती आणि साक्षात्कारासाठी एक मात्र मार्ग आहे.’ सतिपठानतील सती म्हणजे स्मृती. स्मृतीमध्ये प्रस्थापित होणे, स्मृतीमध्ये राहणे म्हणजेच कायेच्या, वेदनेच्या, चित्ताच्या व धम्माच्या स्मृतीचा सराव करणे होय. या कायेच्या, वेदनेच्या, चित्ताच्या व धम्माच्या प्रती सतत जागृत राहणे होय. यालाच अनुपस्यना करणे असे म्हणतात. अनु म्हणजे सतत व पस्यना म्हणजे पाहणे, अनुभव घेणे होय.

कायानुस्मृती म्हणजे कायेबद्दल (काया म्हणजे शरीर) स्मृती ठेवून, आळस सोडून उद्धोगशील, ज्ञानयुक्‍त स्मृतिमान बनून राग, लोभ, मोह व द्वेष यास काढून जागृतीपूर्वक कायेची स्मृती ठेवणे होय. जसे चालतांना चालत आहे, बसतांना बसत आहे, उठत असतांना उठत आहे, झोपलेले असतांना झोपले आहे याची जाणीव ठेवणे होय. रोजच्या जीवनात आपण कायेबद्द्ल अजागृत असलो तर अकुशल कर्म घडु शकतात. म्हणून कायेबद्दल बाह्यस्वरुपात जागृत असावे लागते. अंतरंगात मात्र श्वासाद्वारे कायेचे जागृती ठेवावी लागते. आपल्या मनात ज्या काही भावना उमटतात, त्यावर शरीर श्वासाद्वारे प्रतिक्रिया देत असतात. जसे राग आल्यास श्वास जोरात चालतो. आनापानसतीमध्ये श्वास आंत घेणे व श्वास बाहेर सोडणे ही क्रिया होत असते. जो एक विपश्यनेचा भाग आहे. विपश्यनेमध्ये श्वास आंत घेणे व श्वास बाहेर सोडणे या क्रियेबद्दल जागृत राहावे लागते. तो श्वासाच्या उदय आणि लयाला जाणतो. श्वासाच्या प्रत्येक संस्काराला जाणतो. शरिराच्या अनित्य स्वभावाला जाणत असतो. शरिरइंद्रियाच्या आसक्‍तीला दूर ठेवतो. जसे आपले डोळे हे इंद्रिय, निसर्गातील एखाद्या सुंदर फुलाकडे आकर्षित झाल्यावर तो मोहित होतो व ते फुल तोडण्याची क्रिया आपले शरीराच्या हाताद्वारे करीत असतो. आपण जर श्वासाद्वारे स्मृतिमान असलो तर अश्या आसक्‍तीपासून, मी, माझे अश्या अनात्मतेपासून दुर राहू शकतो. आपण जर सदा स्मृतिमान राहिलो तर आपल्याकडून असे हे अकुशल कर्म घडणार नाही.

वेदनानुस्मृतीमध्ये आपल्या शरिरात इंद्रियाद्वारे वस्तूला स्पर्ष झाला की सुखद, दु:खद व असुखद-अदु:खद अशा संवेदना निर्माण होतात, तेव्हा अशा संवेदनाबाबत जागृत राहाणे होय. विपश्यनेमध्ये आपल्या शरिरातील आतील भागातील वेदनांची स्मृती विपश्यी जागृत ठेवीत असतो. तो वेदनानुस्मृतीचा सराव करीत असतो. वेदनेचा उदय व लय कळल्यानंतर वेदनेच्या कारणास जाणण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते. हे जाणणे प्रज्ञेद्वारे शक्य होते.

चित्तानुपस्सनामध्ये चित्ताच्या स्वभावाला जाणल्या जाते. चित्त म्हणजे मन आणि विज्ञान (जाणिव) याचे समन्वय होय. काया, वाचा आणि मनाचा अनुभव विज्ञान घेत असते. चित्ताच्या स्मृतीमध्ये इंद्रिय कुशल आणि अकुशल कर्माला जाणत असतो. म्हणजेच चांगले काय आणि वाईट काय हे चित्तस्मृती ओळखत असते व त्याप्रमाणे आपल्या शरिराच्या अवयवाकडून काम करुन घेत असते. चित्त शरीराला आकार देत असते. चित्त ज्या प्रकारचे असेल, त्याप्रमाणे शरीर प्रतिक्रिया देत असते. चित्तस्मृती लोभ, द्वेष, मोह इत्यादी विकारापासून दूर जाण्यास मदत करते. बर्‍याच वेळा आपला वेळ आळसात, दुसर्‍यांचा द्वेष करण्यात, अस्वस्थतता व शंका-कुशंकामध्ये जात असतो. परंतु चित्त स्मृतीमुळे याचा लय होतो आणि चित्त शुध्द होते. म्हणून चित्ताबाबत सतत जागृत असणे म्हणजेच स्मृतिमान राहणे अत्यंत आवश्यक आहे.

धम्मानुस्मृतीमध्ये भगवान बुध्दांच्या चार आर्यसत्याच्या शिकवणूकीला जाणतो. तसेच त्यांच्या दु:ख, अनित्य आणि अनात्म या सिध्दांताला जाणतो. नामरुप स्कंधाला व त्याच्या कार्याला जाणतो.

म्हणून सतिपठान सुत्ताच्या या चार स्मृतीचा नियमीत अभ्यास करुन आचरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनुष्य विमुक्तीची अवस्था प्राप्त करु शकतात.

३) सम्यक समाधी

अष्टांगिक मार्गातील आठवा आणि शेवटचा मार्ग सम्यक समाधी हा आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती प्राप्‍त करुन घेण्यासाठी लोभ, द्वेष, आळस, व सुस्ती, संशय आणि अनिश्‍चय हे पांच अडथळे येत असतात. ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे सम्यक समाधी हा होय. कोणतेही कार्य करण्यासाठी सम्यक समाधी महत्वाचे कार्य करते.

मनाला स्थायी व कायम स्वरुपाचे वळण सम्यक समाधीद्वारे लावता येते. चित्ताला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करतो. सम्यक समाधी मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेचे काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्यामुळेच अकुशल कर्माकडे आकर्षित होणार्‍या मनाच्या प्रवृतीला दूर ठेवते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचा़च नेहमीच विचार करण्याची संवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

मिलिंद प्रश्‍नामध्ये समाधीचे गुण सांगितले आहेत. समाधिस्त व्यक्‍ती स्वत: आपला रक्षक बनतो. त्याच्यामध्ये अजेय शक्‍ती निर्माण होते. त्याच्या सर्व अवगुणाचा नाश होतो. सर्व अपयश दुर होतात. यशाची वृध्दी वाढते. संतुष्ट होतो. असंतोषापासून तो दुर राहतो.भयभित होत नाही. आळस राहत नाही, उत्साहित होतो. राग, द्वेश, मोह, गर्वापासून तो दुर राहतो.त्याचा संदेह दुर होतो.त्याचे चित्त स्थिर होते. प्रसन्न राहतो त्याचे चित्त मृदु बनते. गंभिर होतो. त्याला चांगला लाभ प्राप्‍त होते. आदरनिय बनतो. प्रितिवान बनतो. अप्रमादापासून दुर राहतो. त्याला सर्व संस्काराचे दर्शन होते.पुनर्भव होत नाही.

विपश्यना भावना करणार्‍याला जे अहर्ताचे ज्ञान प्राप्‍त होते ते यथार्थ ज्ञान असते. समाधीमध्ये मनाला आनंद वाटते. सम्यक समाधीमुळे ताबडतोब फळाची प्राप्‍ती होत असते. सम्यक समाधी विद्या आणि ज्ञानाचे सार आहे. योग्यप्रकारे छावलेल्या घरात जसे पाणी शिरत नाही, तसेच समाधिस्त चित्तामध्ये राग, लोभ इत्यादी मनोविकार शिरत नाहीत असे सम्यक समाधीचे फायदे व महत्व धम्मपदामध्ये सांगितले आहे.

मानसिक स्थिरतेसाठी ध्यान-भावनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ सम्यक समाधीच बिघडलेल्या चिंतन, मननाला शांत राखू शकते.

पी.नरसु या लेखकाने ‘बौध्द धर्म का सार’ या पुस्तकात दहा प्रकारचे फायदे सागितले आहेत. ते असे-

१. जेव्हा माणूस विधीपूर्वक ध्यान-भावनेचा अभ्यास करतो तेव्हा त्याचे सर्व इंद्रिय शांत व गंभीर होतात आणि त्याला हे माहित पण पडत नाही. तो त्यात आनंद घेऊ लागत असतो.

२. मैत्री भावना त्याच्या हृदयाला भिडून जात असते आणि तो सर्व प्राण्यावर आपल्या बहिन-भावासारखे प्रेम करीत असतो.

३. प्रेमाची आंधळी ईर्षा सारख्या विषारी आवेशाला तो आपल्या चित्तातून हळूहळू काढून टाकतो.

४. सर्व इंद्रियांचे निरिक्षण केले जात असल्यामुळे ध्यान-भावना माराच्या आक्रमणापासून सुरक्षित राहते.

५. जेव्हा हृदय पवित्र व प्रवृती शांत होत जाते तेव्हा ध्यान-भावना करण्यावर कोणत्याही खालच्या स्तरावरचा आवेश त्याच्यावर आक्रमण करीत नाहीत.

६. जेव्हा चित्त वरच्या स्तरावर एकाग्र होतो, तेव्हा तो वर्व प्रकारच्या आकर्षापासून आणखी दुर राहतो.

७. जरी चित्त अहंकारापासून दुर राहिला तरी तो ऊच्छेदवादाच्या जाळ्यात गुंतून राहत नाही.

८. जीवन-मरणाच्या जंजाळामध्ये कितीही गुंतून असला तरीही त्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत असतो.

९. धम्माच्या खोलात जात असल्यामुळे भगवान बुध्दाच्या शिकवणीनुसार तो आपले जीवन व्यतीत करीत असतो.

१०. त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, मोह होत नाही.

ध्यानभावना असा एक अभ्यास आहे की, जो प्रकाशाकडे घेऊन जातो. जगाकडे त्याला एका नवीन रुपाने पाहण्याची दृष्टी येते. तो आसक्‍तीरहित, रागरहित व द्वेषरहित बनतो. ध्यानभावना हे चित्ताला विकसित करण्याचे एक साधन आहे.

अशा प्रकारे प्रत्येकांने अष्टांग मार्गाचा म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी ह्या सदाचार मार्गाचा अवलंब केल्यास एक माणूस दुसर्‍या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमाणुषपणा यापासून तो दूर राहील.

No comments: