Friday, July 8, 2011

प्रकरण अकरावे - प्रज्ञा

प्रज्ञा म्हणजे कुशल विचारांसहित आलेले पुर्ण ज्ञान की ज्यायोगे दु:ख आर्यसत्य, प्रतीत्यसमुत्पाद, आर्य अष्टांगिक मार्ग याचे यथार्थ ज्ञान होते. म्हणून सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प यांचा समावेश प्रज्ञेत केला जातो. वस्तुमात्र जसे आहेत तसे पाहणे, वस्तुमात्रांच्या वस्तुस्थिती संबंधीचा गोंधळ नष्ट करणे म्हणजेच प्रज्ञा. दु:ख नष्ट करण्यासाठी, निर्वाण प्राप्‍त करण्यासाठी किवा अर्हतपद मिळविण्यासाठी प्रज्ञा, शील व समाधी यातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रज्ञा आहे. सत्य व आर्यसत्य जाणणे, शोध घेणे, भ्रांतचित्त्त न होणे हे प्रज्ञेचे कार्य आहे. प्रज्ञेमुळे पुढिल फयदे होतात. १) शीलाचे महत्व कळते, २) समाधीची अत्युच्च पायरी गाठता येते, ३) आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती करता येते, ४) विशुध्द जीवनाची फळे दिसू शकतात, ५) सर्व वस्तुमात्रांचे यथार्थ दर्शन होते, ६) पाखंडी मताचे यथार्थ ज्ञान होते व ७) लोभ, द्वेष व मोह याच्यापासून दुर राहता येतात.

प्रज्ञेचे चिंतनमय, श्रुतमय व भावनामय असे तीन प्रकार आहेत. चिंतनावर आधारलेल्या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. जी दुसर्‍यांकडून शिकली जाते आणि जी पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे तीला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. सततच्या अभ्यासाने बौध्दिक विकासातून जी स्वयंस्फुर्त येते ती भावनामय प्रज्ञा.

अष्टांगिक मार्गातील सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे मार्ग प्रज्ञामध्ये य़ॆतात.

१) सम्यक दृष्टी

अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी हा आहे. सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश करणे हा आहे. मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्य समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. कर्मकांडावर विश्वास न ठेवणे, निसर्ग नियमाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, काल्पनिक अनुमानावर विश्वास न ठेवता वास्तवतेच्या व अनुभवाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवणे इत्यादी गोष्ठी सम्यक दृष्टीमध्ये येतात. सम्यक दृष्टी आपल्या मनाला योग्य त्या दिशेने घेऊन जाते आणि आपल्या मनाला योग्य वळण लावते.

भगवान बुध्दाच्या काळात ब्राम्हण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राम्हण तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान सहा पंथ तरी प्रमूख होते. परंतू ह्या पंथाची विचारसरणी मिथ्या दृष्टीवर आधारित होती. भगवान बुध्दाला या तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले होते. म्हणून त्यांनी सम्यक संबोधी प्राप्‍त करुन आर्य अष्टांगिक मार्ग सर्वप्रथम पंचवर्गिय भिक्षूंना सांगितला. दु:ख, अनित्य, अनात्म व निर्वाण या मूलभूत सिध्दांतावर त्यांची विचारसरणी आधारलेली आहे. तीच सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी हा प्रज्ञेचा मार्ग आहे. भगवान बुध्दाचा धम्म विज्ञानावर आधारित आहे. वास्तव आणि सत्यावर आधारित आहे. यालाच सम्यक दृष्टी म्हणता येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय राज्य घटनेत नागरिकांची काही कर्तव्य कलम ५१ (अ) मध्ये विशद केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्साप्रवृती याची वाढ व जोपासना करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, अशी स्पष्ट तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच बौध्दिक विचार (Rational thinking) हे होय. ‘चिकित्सक बुध्दी वाढीस लावणे’ हा विज्ञानाचा पाया आहे. सत्यशोधन हा विज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. भगवान बुध्दांनी धम्माला पूर्णपणे विज्ञाननिष्ट बनविण्यावर भर दिला. त्यालाच त्यांनी ‘प्रज्ञा’ म्हटले आहे. प्रज्ञा हेच सम्यक दृष्टीचे तत्व असून भगवान बुध्दाच्या धम्माचे अधिष्ठान आहे.

भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध जोडल्या गेलेला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर व आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत भगवान बुध्दाने म्हटले आहे की, खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर या सर्व गोष्टिमध्ये एकतर तोच विद्यमान आहे. अथवा अशा अनिष्ट गोष्टिचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. समाजात रुढ झालेल्या ईश्वरविषयक संकल्प्नेला त्यांनी विरोध केला आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून उत्क्रांत झालेली आहे असे त्यांचे ठाम मत होते.

दु:खाचे कारण शोधण्यासाठी भगवान बुध्दांनी वापरलेले सूत्र म्हणजे निरिक्षण, प्रयोग व विश्‍लेषण. हेच सूत्र आधुनिक संशोधनासाठी वैज्ञानिक वापरतात. म्हणजेच भगवान बुध्दाचा तर्कशुध्द, बुध्दीनिष्ट स्वतंत्र विचार आणि स्वानुभूतीप्रामाण्य आणि त्यांनी सत्य शोधण्यासाठी वापरलेले सूत्र यांच्या आधारावरच जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आपले शोध लावलेले आहेत. म्हणून आपण असे म्हणू शकतो की, भगवान बुध्द हे वैज्ञानिक विचाराचे आद्यजनकच नाहीत तर ते आधूनिक विज्ञानाचे प्रणेते सुध्दा आहेत.

मज्झिमनिकायातील सम्मादिठ्‍ठी’ या सुत्तात सम्यक दृष्टीचे विश्‍लेषण केले आहे. अकुशल व कुशलाचे मुळ यांत सांगितले आहे. ते असे- १) प्राणी हिंसा करणे २) चोरी करणे ३) मिथ्याचार करणे ४) खोटे बोलणे ५) चुगली करणे ६) कठोर बोलणे ७) व्यर्थ बडबड करणे ८) अभिध्या करणे (लालच करणे) ९) व्यापाद करणे (प्रतिहिंसा करणे) व १०) मिथ्या दृष्टी (खोटी धारणा) बाळगणे हे अकुशल आहे. अकुशलाचे मूळ लोभ, द्वेश व मोह आहे. तथापी १) प्राणी हिंसा न करणे २) चोरी न करणे ३) मिथ्याचार न करणे ४) खोटे न बोलणे ५) चुगली न करणे ६) कठोर न बोलणे ७) व्यर्थ बडबड न करणे ८) अभिध्या न करणे (लालच न करणे) ९) व्यापाद न करणे (प्रतिहिंसा न करणे) व १०) मिथ्या दृष्टी (खोटी धारणा) न बाळगणे हे कुशल आहे. कुशलाचे मूळ अलोभ, अद्वेश व अमोह आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात एका खेडवळ ब्राम्हणाला धम्मदिक्षा देतांना एक संवाद आला आहे. ते ब्राम्हण भगवान बुध्दांना सांगतात की, ‘आम्ही निरनिराळ्या ‌ऋतूनुसार सुर्य, चंद्र, प्रजन्य आणि अग्नी यांची पुजा करतो व त्यांना होमहवन करतो. तसेच एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रम्हलोकांत त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्ममरणाच्या फेर्‍यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो.‘ तेव्हा भगवान बुध्द म्हणतात की, ‘जे थोतांडाचा अवलंब करुन असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्‍गती प्राप्त होत नाही. परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्य मानणे, ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हांला सद्‍गती लाभेल.’

२) सम्यक संकल्प

अष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग सम्यक संकल्प हा आहे. जीवनातील अत्युच्च ध्येय प्राप्‍तीसाठी सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे आहे. जीवनामध्ये ध्येय प्राप्‍तीचा संकल्प मोलाचे कार्य करतो. इतर धर्मामध्ये ध्येय प्राप्‍तीसाठी ज्याला मिथ्या संकल्प म्हणता येईल असे देवाची आराधना करण्याचा संकल्प करतात. तथापी भगवान बुध्दांनी साधकाला सम्यक संकल्पाचा जो उद्देश सांगितला तो निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. निर्वाण हा जीवनातील अत्यंत श्रेष्ट अवस्था आहे. सार्‍या समस्‍येचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेच्या मागे सारे प्राणी धावत असतात. जीवनामध्ये दु:ख उत्पन्न करणार्‍या राग, द्वेष आणि मोह यामध्ये ते गुरफटून जातात. त्यांना पराजित करण्याचे व त्यातून मुक्‍त होण्याचे कार्य केवळ सम्यक संकल्पामुळे होऊ शकते. दु:खाचे मुळ तृष्णा आहे. निर्वाण तृष्णेचा नाश करतो. तृष्णेचा नाश करण्याचे कार्य सम्यक संकल्पच करु शकते. म्हणून मिथ्या संकल्पाऎवजी भगवान बुध्द सम्यक संकल्पाकडे घेऊन जातात. सम्यक संकल्पात उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येये, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याचा समावेश होतो. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार येत असतात आणि म्हणून या विचारांना योग्य अशी दिशा देण्याच्या दृष्टीने सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे अंग आहे. जगामध्ये दु:ख आहे आणि या दु:खाला दूर करणे हा सम्यक संकल्पाचा मुख्य हेतू आहे. जीवनात यशस्वी होण्याकरीता जशी सम्यक दृष्टी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यशस्वी होण्याच्या मार्गाला प्राप्‍त करण्यासाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता आहे. बुध्द, धम्म आणि संघ या त्रिसरणाचे अनुसरण करणे, पंचशीलाचे पालन करणे, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिताला आपल्या जीवनात रुजविणे याकरीता सम्यक संकल्प आवश्यक आहे. श्रध्दा, वीर्य, स्मृती, समाधी व प्रज्ञा हे पाच बळ प्राप्‍त करण्याकरीता सम्यक संकल्पाची अत्यंत आवश्यकता असते. जीवनात भगवान बुध्दापासून ते भिक्‍खू-भिक्‍खूणी, उपासक-उपासीका यांनी जे यशाचे अत्युच्च शिखर गाठले ते सम्यक संकल्पामुळेच गाठले.

No comments: