Saturday, July 9, 2011

प्रकरण नववे - चवथे आर्यसत्य - दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा

दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्‍या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो. या मार्गानेच निर्वाणाकडे जाता येते. दु:ख निरोधाचा हा एकच मार्ग असल्यामुळे त्याला दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा असे म्हणतात.

जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले, दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा. तेव्हा भगवान बुध्द म्हणाले, माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.

जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दु:खाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितले नाही. तसेच जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दु:खाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितले नाही.

प्रत्येकजन सुखासाठी धडपडत असतो. एकदा अनाथपिंडकाने गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्यासाठी भगवान बुध्दांना विचारले, तेव्हा भगवान बुध्द म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते. त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे, या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख उपभोगाचे आहे. गृहस्थाजवळ धन असते. त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते. तिसरे सुख म्हणजे कर्जहिनता, असे गृहस्थ जे कोणाचेही कर्जामध्ये राहत नाही. यामुळे तो सुखी राहतो. मला कॊणाचेही कर्ज फेडावे लागत नाही, ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो. चवथे सुख निर्दोषतेचे आहे. काया, वाचा व मनाने तो निर्दोष कृत्य करीत राहिल्याने तो सुखी राहतो. जर गृहस्थ असा प्रयत्‍न करील तर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल.

हा मार्ग पावित्र्य (विशुध्दी) म्हणजे पंचशीलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शीलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन. बारावी प्रतिज्ञा म्हणजे, मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन. तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशीलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन. चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, मी चोरी करणार नाही. पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, मी व्यभिचार करणार नाही. सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, मी खोटे बोलणार नाही. सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, मी दारु पिणार नाही. जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.

No comments: