Saturday, July 9, 2011

प्रकरण आठवे - तिसरे आर्यसत्य - दु:खनिरोध

दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्‍ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्‍त झाले तो तृष्णेपासून मुक्‍त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. तृष्णेतून दु:ख निर्माण होते. तृष्णेमुळे भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्‍त झाल्याने दु:ख आणि भय यापासून मुक्‍तता लाभते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्‍त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्‍हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढऊन घेतो.

निर्वाण मार्ग

संसारात असलेला प्रत्येक मानव आपण सुखी व्हावे अशी आशा-आकांक्षा बाळगून सुख प्राप्‍तीसाठी झटत असतो. प्रत्येक धर्मातील व्यक्‍ती त्या त्या धर्मातील तत्वज्ञानानूसार सुखाचा शोध घेत असतो. जसे मृग पाण्याच्या शोधाकरीता सैरावैरा वाट मिळेल तिकडे धावत असते, वाटेत वाळवंटालाच जलाशय समजू्न तृष्णा शमविण्यासाठी तिकडे धाव घेते, परंतू ते जलाशय नसून आभास आहे, असे जेव्हा त्याला कळते त्यावेळी त्याच्या पदरी निराशा पडते.

त्याच प्रमाणे ईश्वर, आत्मा, ब्रह्म यांच्या मागे धावणार्‍यांची गत झाली आहे. धर्माचे शीतल जल पिवून निष्पाप व सुखी व्हावे या हेतूने तो ईश्वरीय धर्माकडे गेला. परंतु ते त्यांच्यासाठी भ्रामक कल्पनेवर आधारलेले मृगजल ठरले. जीवंतपणी केलेल्या पापपूण्याचे सुख, मृत्यूनंतर मिळेल अशी त्याला आशा दाखविली. परंतु भगवान बुध्दांनी मानवाला सुखी बनविण्याचा जो उपदेश केला तो जीवंत माणसाच्या कल्याणाचा, जीवंत माणसाला निष्पाप बनविण्याचा, जीवंतपणीच दु:ख मुक्‍त होण्याचा मार्ग दाखविला. त्याला सुखाचा खरा मार्ग भगवान बुध्दाच्या धम्मात मिळाला. त्यालाच निर्वाण मार्ग म्हणतात.

निर्वाण म्हणजेच जीवंतपणीच प्राप्‍त झालेले निर्वाण. अशा निर्वाण प्राप्‍त झालेल्या अहर्ताची सर्व बंधने तुटलेली असतात. त्यांचेवर कसलेही संस्कार होत नाहीत. तो असंस्कारीत होतो. कारण त्याला निर्वाण प्राप्‍त झालेले असते. जगात असंस्कारीत फक्‍त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे निर्वाण. हाच निर्वाण मार्ग बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय. याच्याच प्रचारासाठी वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत भ्रमण करुन खर्‍या निर्वाण सुखाचे मानवाला अमृत पाजले.

No comments: