Saturday, July 9, 2011

प्रकरण चवथे - पहिले आर्यसत्य - दु:ख

दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. म्हणून भगवान बुध्दांची शिकवण दु:खाच्या अस्तित्वापासून सुरु होते. जगातील सर्व प्राणिमात्राना जोडणारा एकच दुवा आहे, आणि तो म्हणजे `दु:ख. दु:ख आर्यसत्य न सजल्यामूळे अनेकांनी अज्ञानामुळे देव, आत्मा, परमात्मा, ब्रम्ह, ईत्यादी काल्पनिक गोष्टीवर आपल्या तत्वज्ञानाचा डोलारा उभा केला आहे. परंतू हे तत्वज्ञान वैज्ञानीक कसोटीवर उतरु शकत नाही. जगातील सर्व प्राणिमात्राना दु:ख प्रत्यक्ष भोगावे लागते. म्हणून प्रत्येक जण दु:खापासून मुक्‍त होवून सुख प्राप्तीसाठी धडपडत असतो.

भगवान बुध्द आपल्या शिकवणीत म्हणतात, जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे. आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. रडणे-ऒरडणे, पीडित होणे, चिंतित होणे, त्रस्त होणे हे सर्व दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे.. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते.

भगवान बुध्दाने नैसर्गिक कारणांमुळे निर्माण झालेल्या दु:खाची चर्चा केली नाही. त्यांनी सामाजिक कारणांमुळे उत्पन्न होणार्‍या दु:खाची चर्चा केली. वेगवेगळ्या वर्गातील जाती व गटांमधील कलह, सामाजिक विषमता, अन्याय, संघर्ष यामूळे दु:ख निर्माण होते असे त्यांनी सागितले.

दु:ख हा शब्द शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिने वापरला आहे. जन्म, व्याधी, आजारपण, म्हातारपण हे शारिरीक दु:ख आहे. इच्छा़ची पुर्तता न होणे हे मानसिक दु:ख आहे. पांच उपादान स्कंध हे आध्यात्मिक दु:ख आहे. यात व्यथा, भोग, ताप, त्रास, कष्ट, क्लेश, वैफल्य, त्रागा, पीडा, कारुण्य, विषाद, अशांतता, असमधानकारता, शोषण, चिंता, निराशा ईत्यादि अनेक दु:खद छटांचा समावेश होतो. शोक करणे, रडणे, ओरडणे, विलाप करणे, चिंताग्रस्त होणे, त्रस्त होणे हे निरनिराळ्या दु:खाचे अविष्कार आहेत. अप्रियांचा संयोग व प्रियांचा वियोग हा इच्छापूर्ती न झाल्यामुळे होणार्‍या मानसिक दु:खाचा विस्तार आहे. व्यक्‍तीनूसार आणि संदर्भानूसार दु:खाचे हे वर्गिकरण बदलत असते. त्यामुळे ते ठराविक आहेत असे म्हणता येत नाहीत.

मानवाने मानवाची केलेली पिळवणूक आणि शोषण यामुळे निर्माण होणारे दु:ख याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लक्ष वेधले आहे

प्राणिमात्रांच्या उत्क्रांतीत शारीरिक दु:ख हे खालच्या पहिल्या स्तराचे दु:ख आहे. त्याच्या वरच्या दूसर्‍या स्तरावरचे दु:ख म्हणजे मानसिक दु:ख होय. जीवनाविषयीच्या आपल्या कल्पन्ना आणि जीवनातील वास्तवता यांच्यात तफावत आली म्हणजे आलेल्या निराशेतून मानसिक दु:ख निर्माण होते. तिसर्‍या स्तरावरील दु:खामध्ये आपण आपल्या नाशवंत शरीराची किंवा आपल्या क्षणभंगुर जीवनाची फारशी काळजी करीत नसतो. आपले दु:ख जास्तीत जास्त सर्वव्यापी बनते. अशावेळी आपण दुसर्‍यांचा दु:खात सहभागी होत असतो. आतापर्यंत आपण स्वत:लाच जास्त महत्व देत आलो असतो. आपण आपल्या अहंपणामुळे स्वत:वर बंधन ओढवून घेतले असते. त्या अहंपणामध्ये आपण गुरफटून गेल्यामुळे आपण आपला विकास खुंटवून टाकलेला असतो. असे हे दु:खाचे सर्वसाधारणपणे तिन स्तर आहेत.

जगात दु:ख आहे हे सर्वकालीन सत्य आहे. हेच सत्य भगवान बुध्दाने पहिल्या आर्यसत्यात सांगितले आहे. दु:खाचा पगडा सर्व जीवनावर असतो. सर्व जग दु:खाने पिडित आहे. जगातील कोणताही प्राणी दु:खापासून मुक्‍त नाही. जगाकडे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहणारा कोणताही सुज्ञ व्यक्‍ती हे नाकारु शकत नाही. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे याचा अर्थ जगातील सुखाचे अथवा आनंदाचे अस्तित्व नाकारणे असा होत नाही. दु:खाचे अस्तित्व प्रतिपादन करतांना भगवान बुध्दांनी सुखाचे अथवा आनंदाचे अस्तित्व कधिही नाकारले नाही हे त्यांनी महाली लिच्छवीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सांगितले आहे. म्हणून भगवान बुध्दांचा धम्म निराशावादी आहे असे कदापिही म्हणता येणार नाही.

मनुष्यप्राणी इंद्रियाद्वारे त्या त्या विषयाकडे आनंद व सुख उपभोगण्यासाठी आकर्षित होवून त्यात रममाण होतात. परंतु तो आनंद व सुख चिरकाल टिकणारा ठरत नाही. तेव्हा तो बव्हंशी दु:खी व निराश होतो. मनुष्याला तोच-तोचपणा आवडत नाही. त्याला जीवनात विविधता पाहिजे असते. ज्याप्रमाणे गवत खाणारे प्राणी नेहमी ताज्या कुरणाकडे आकर्षित होतात, तसेच मानवप्राणी सुध्दा आनंद व सुख नव-नवीन गोष्टीकडे वळत असतात. पण हा आनंद व सुख सुध्दा क्षणैक असतो. म्हणून प्रत्येक सुखकारक गोष्टीच्या मागे दु;ख असते. ही एक दु:खाची पहिली अवस्था आहे.

अशातर्‍हेने मिळविलेले आनंद व सुख क्षणैक ठरत असते. परंतु ह्या वस्तुस्थितीची जाणीव माणसाला नसते. मात्र जेव्हा तो या आनंद व सुखापासून हिरावल्या जातो तेव्हा तो दु:खी व निराश होतो. तो आपल्या मनाचा तोल घालवून बसतो. ही एक दु:खाची दूसरी अवस्था आहे. मनुष्यप्राण्याला या दोन्हिही प्रकारच्या मानसिक अवस्थांना तोंड द्यावे लागते.

पण जो मनुष्य मुक्‍त झाला आहे तो सुख-दु:खांना वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. जीवनात कोणताही बरा-वाईट प्रसंग आला असता त्याचे चित्त विचलीत होत नाही. अशा बर्‍या-वाईट प्रसंगाकडे तो समानतेच्या भावनेने पाहत असतो. तो सुखाने बेहोष होत नाही किंवा दु:खाने वेडा-पीसा होत नाही. तो कधिही चिंताग्रस्त होत नाही. तो चिंतेतून मुक्‍त झालेला असतो.

जगातील सर्व संस्कारीत वस्तू सतत बदलत असतात. त्या अस्तित्वात येतात आणि नाहिसेही होत असतात. ह्या संस्कारचक्रातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रत्येकांचे ह्या जगातील अस्तित्व अगदी थोड्या काळापूरतेच राहात असते. जीवनातील ह्या क्षणभंगूरतेमुळे खर्‍या अर्थाने जगात कायमचे सुखकारक असे काहिच नाही. जीवनात सुख आहे परंतु ते क्षणभंगूर आहे. मनूष्याला अनुभवास येणारे सर्व सुख आणि आनंद लवकरच अस्पष्ट होतात आणि कालांतराने ते लोप पावतात.

मनुष्यप्राण्याचे सर्व घटक म्हणजे नामरुप, विज्ञान, संज्ञा, वेदना, व संस्कार तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे पंचस्कंधात सामावलेले आहेत. पंचस्कंधाशिवाय मनुष्यप्राण्यात दुसरा कोणताच घटक अस्तित्वात नाही. असा कोणताच घटक नाही की जो पंचस्कंधात सामावलेला नाही. सर्व पंचस्कंध सतत बदलणारे आहेत. परिवर्तनशील आहेत. म्हणूनच दु:ख आर्यसत्य स्पष्ट करुन सांगतांना भगवान बुध्द म्हणतात, हे पांच उपादानस्कंध थोडक्यात दु:खमय आहे. दु:ख हे पांच उपादानस्कंधापेक्षा वेगळे नाहीत. पांच उपादानस्कंध आणि दु:ख एकच आहेत. अनित्य आहे. जे अनित्य आहे ते दु:ख आहे.

No comments: