Saturday, July 9, 2011

प्रकरण दुसरे - दु:खाची पुर्वपिठीका

जगातील सर्व प्राणी दु:खाने पिडलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने ते दु:खी झालेले असतात. मनाच्या विरुध्द कुठली गोष्ट घडली की झाला दु:खी ! सर्व संसार दु:खाच्या समुद्रात गटांगळ्या खात आहेत. जेथे जेथे जीवन आहे तेथे तेथे दु:खही दु:ख भरलेले आहे.

केवळ मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी माणसां-माणसात झगडा, कलह, भांडण, वाद-विवाद अशा गोष्टींचा जिकडे तिकडे बोलबोला दिसून येईल. जिकडे तिकडे आतंकवाद, फुटिरतावाद, वर्णवाद, वर्गवाद, जातीवाद, धर्म-पंथवाद, भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद अशा गोष्टी बोकाळलेल्या दिसतील. जिकडे तिकडे चोरी, लुटमार, फसवणुक, हिंसाचार, भ्रष्टाचार, खोटेपणा याच गोष्टींचा भरमार दिसून येईल.

लोकं कोणत्या ना कोणत्या तरी भितीने ग्रस्त झालेला असतो... थंडी वाढली तरी भिती... गरमी वाढली तरी भिती... खुप पाऊस पडला तरी भिती... कमी पाऊस पडला तरी भिती... कुणाला भुकेची-तहानेची भिती... कुणाला रोगराई, बिमारी, मरणाची भिती... कुणाला म्हातारपणाची भिती... कोणी तलवार, चाकु बंदुका काढल्या की भिती...कोणी चोरी, लुटमार करेल कां म्हणून भिती... कुणाला लढाई ची भिती... बॉंबस्फोटात मरण्याची, जखमी होण्याची भिती... आगिची, अपघाताची भिती.... दहशतवादी, नक्षलवादी लोकांची भिती...भितीच भिती...जो तो भितीने पछाडलेला असतो. याचे पर्यवसान त्याला दु:ख निर्माण करण्यात होत असते.

कोणी भुकेने तडपतो आहे. कोणी तहानेने व्याकुळ होतो. कुणाकडे शरीर झाकण्याकरीता पुरेसे वस्त्र नाहीत. कुणाला ऊण, वारा, पावसापासून वाचण्यासाठी आच्छादन नाही. कोणाकडे दवाई-पाणी घेण्याकरीता पुरेसे पैसे नहीत. कोणी आपल्या मुला-बाळांना शिकवू शकत नाही. कोणी गरिबीपूढे हात टेकले आहेत. कोणाकडे पैसा असुनही मानसीक समाधान नाही. म्हणजेच दु:खाला पारावार नाही !

कुठे पती व पत्नीमध्ये भांडण, कुठे वडील व मुलांमध्ये भांडण, कुठे आई व मुलामध्ये भांडण, कुठे मुलां-मुलांमध्ये भांडण, कुठे सासु व सुनांमध्ये भांडण, कुठे शेजार्‍यां-पाजार्‍यांशी भाडण, कुठे मोहल्या-मोहल्यात, गावां-गावां भांडण. कुठे जाती-जातींमध्ये भांडण. कुठे धन-संपत्तीसाठी भांडण, कुठे जमिन-जुमल्यासाठी, कुठे मानसन्मानासाठी भांडण, कुठे हुंड्यासाठी भांडण. भांडणाला काही अंत नाही. पुढे हे भांडण विकोपाला जावून मारामारी, खुन, जाळपोळ, हिंसाचार इत्यादी प्रकार घडतात. मग हे प्रकरण पोलीसांपर्यंत, कोर्टापर्यंत जाते. त्याची परिणीती म्हणजे मानहानी व पैश्याची नासाडी... कोर्टाच्या निकालानंतर तुरुंगवास अथवा फाशीची शिक्षा... म्हणजेच भांडणाचा शेवट हा दु;खांमध्येच परिवर्तीत होते.

कोणी आपल्याला हिंदु म्हणोत, बौध्द म्हणोत, ख्रिचन म्हणोत, शिख म्हणोत, जैन म्हणोत अथवा कोणी मुसलमान म्हणोत. कोणीही या दु:खापासून मुक्त नाही. कोणताही मनुष्य मग तो गरिब असो की श्रिमंत, गृहस्थी असो की गृहत्यागी-सन्यासी, अशिक्षित असो की सुशिक्षित , राजा असो की रंक अश्या सर्वांनाच दु:खापासून सुटका नाही.

हे दु:ख काय आहे ? या दु:खामागील कारणे कय आहेत ? या दु:खाला लोकं वारंवार बळी कां पडतात. या दु:खाचे निवारण करणे शक्य आहे काय ? जर असेल तर त्याचे उपाय काय आहेत ? दु:ख निर्माण होण्यापुर्विच त्या मागिल कारणाला रोखणे शक्य आहे काय ? इत्यादी अनेक प्रश्‍न सर्वांनाच पडते. कित्येकांनी त्याचा शोध घेऊन पाहिला असेलही ! कित्येकांनी याच्या मागे देव, ईश्वर, परमात्मा यासारखे शक्ती असल्याचे कारणे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकून टाकली आहे. . त्यासाठी त्यांनी देवपुजा, देवभक्ती, आहुती देणे, नैवद्य देणे, बळी देणे, लाच देणे, इत्यादी दु:खमुक्तीचे अगदी सोपे उपाय सांगितले आहेत. जीवनात केलेल्या दुष्कृत्याच्या पापाची डागे गंगा, गोदावरी सारख्या तथाकथीत पवित्र नदीमध्ये व कुंभमेळ्यामधे स्नान करुन धुवून काढता येते अशी शिकवण धर्मभोळे लोकांना सांगितले आहे. परंतु भगवान बुध्दाने मात्र याचा शोध शास्त्रिय व वैज्ञानीक दृष्टिकोनातून घेतला आहे. दु:ख, दु:ख निर्मिती, त्याची कारणे, त्यावर उपाय इत्यादी सर्व बाबींचा सखोलपणे अभ्यास करुन त्यानी सविस्तर अशी मांडणी केली आहे.

प्रकरण तिसरे - भगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात

सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. त्यावर्षी त्यांच्या मध्ये फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.

शाक्याच्या सेनापतीने कोलियांच्या विरुध्द युध्द पुकारण्याचा ठराव शाक्य संघामध्ये मांडला. सिध्दार्थाने या ठरावाला विरोध केला. सिध्दार्थ म्हणाले, “युध्दाने कोणतेही प्रश्‍न सुटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्‍या युध्दाची बिजे रोवली जातील. जो दुसर्‍याची हत्त्या करतो, त्याला त्याची हत्त्या करणारा भेटतो. जो दुसर्‍याला जिंकतो, त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हा प्रश्‍न दोन्हिही बाजूचे प्रतिनिधी निवडुन सामोपचाराने मिटवावे ” परंतू सिध्दार्थाने मांडलेल्या या सुचनेचा काहिही उपयोग झाला नाही. सिध्दार्थाने सैन्य भरतीच्या निर्णयाला सुध्दा विरोध केला. या विरोधामुळे सिध्दार्थाला शाक्य संघाच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार होते. त्याचे तीन स्वरुप होते. एक सैन्यात दाखल होऊन युध्दात सामील होणे, दुसरे देहान्तशासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे व तिसरे आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढऊन घेऊन, त्यांच्या मालमत्तेची जप्‍ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला आणि तिसरा पर्याय न स्विकारता त्यांनी परिवर्ज्या घेऊन देशत्याग करायाचे ठरविले.

सिध्दार्थ त्याची आई-गौतमी, वडील-शुध्दोधन व पत्‍नी-यशोधरा यांना भेटायला महालात गेले. आई-वडील अत्यंत दु:खमग्न झाले होते. यशोधराने मात्र धैर्याने व उदात्त मनाने अनुमती देऊन सिध्दार्थाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यशोधरा म्हणाली, “ ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जेवनमार्ग शोढुन काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”

मानवजातीच्या कल्याणाचा ध्यास घेऊन सिध्दार्थाने राजगृह सोडला. राजगृह सोडण्याचे व परिव्रजा घेण्याचे हेच एक कारण होते. ज्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये केला आहे. मृत देह, आजारी आणि जराजर्जर झालेला व्यक्‍ती पाहून सिध्दार्थाने परिव्रजा घेतली, असे पारंपारिक व हास्यास्पद असे उत्तर दिले जातात. हे उत्तर विश्वासार्ह नाही व बुध्दीलाही पटण्यासारखे नाही. कारण सिध्दार्थाने आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. परिव्रजा घेण्याचे हेच जर कारण असते तर ही तीन दृश्ये त्यांना कधी दिसली नाहीत कां ? ह्या शेकडयांनी घडणार्‍या नेहमीच्या घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी सिध्दार्थाच्या नजरेस न येणे असंभव आहे, असे या ग्रंथाच्या ‘परिचय’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे.

सिध्दार्थाला कोलीय आणि शाक्य यांच्यातील युध्द संघर्षामुळे घर सोडावे लागले होते. परंतू त्यानंतर शाक्यांनी कोलियांसोबत शांततेने वाटाघाटी करुन हा प्रश्‍न सोडवावा म्हणून मिरवणुका व निदर्शने करुन मोठी चळवळ केली. परिनामत: कोलीय आणि शाक्य यांच्यात समेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला त्यांचे सोबत असलेल्या पाच परिव्राजकाने सांगितले. ते पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक होते. त्यांनी सिध्दार्थाला सुचना केली की, ‘आता यापुढे परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर राहावे. तरिही सिध्दार्थ घरी परत गेले नाहीत. कारण त्यांनी खोलवर विचार केला की, युध्द समस्या ही मूलत: कलहसमस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्‍त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आला आहे असे नव्हे: तर क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यात, कुटुंब-प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि सहकार्‍यांत देखील चालू आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त जरी असला तरी वर्गा-वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरुपाचा असतो. हा संघर्ष़च जगातील सर्व दु:खाचे मूळ होय. म्हणून या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर शोधून काढले पाहिजे असे सिध्दार्थाने ठरविले होते.

त्यामुळे सिध्दार्थ नव्या प्रकाशाच्या शोधात निघाले. मार्गात त्यांनी भृगुॠषीचा आश्रम पाहिला. सिध्दार्थाने त्या तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या कठोर तपश्‍चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. अशा कठोर तपश्‍चर्या केल्याने स्वर्गप्राप्‍ती होते, दु:खमार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्‍ती होते व दु:ख हे पुण्याचे मुळ आहे असे त्या तपस्व्यांना वाटत होते. हे ऎकल्यावर गौतम म्हणाला, “अशा प्रकारचा आश्रम मी प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्‍चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्‍चर्या स्वर्गप्राप्‍तीसाठी आहे, तर ऎहिक जीवनातील दु:खाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वत: समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे.”

भृगुॠषीचा आश्रम सोडून सिध्दार्थ आलारकालाम या मुनीकडे वैशालीला गेले. आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिध्द होते. आलारकालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे सिध्दार्थाला वाटत होते. तेथे त्यांनी आलारकालामाला त्यांच्या सिध्दांताचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त केली. आलारकालामांनी सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करुन सांगितली. तसेच त्यांनी ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात पायर्‍या होत्या. सिध्दार्थ त्या तंत्राचा रोज अभ्यास करायचा. सिध्दार्थांनी त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविले. जेवढे काही शिकण्यासारखे होते ते आलारकालामांनी सिध्दार्थाला शिकविले. आलारकालामांनी जे काही शिकविले त्यापेक्षा वरच्या पायरीचे शिक्षण घेण्याकरीता सिध्दार्थ उद्दक रामपुत्त नांवाच्या योग्याकडे गेले. तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च पायरीचे शिक्षण घेऊ लागले. काही थोडया काळातच उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी सिध्दार्थांने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताला जेवढे काही शिकण्यासारखे होते ते उद्दक रामपुत्तांनी सिध्दार्थाला शिकविले. आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिध्द होते. मगध देशातही अशाप्रकारे ध्यानमार्गसंपन्न योगी होते. त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. ही प्रक्रिया अत्यंत दु;खदायक होती. तरीही सिध्दार्थ ही प्रक्रिया आत्मसात करण्यात यशस्वी झाले. समाधीमार्गाचे अशाप्रकारचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

सिध्दार्थाने सांख्य तत्वज्ञान व समाधिमार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु वैराग्यमार्गाची कसोटी न घेता भृगुॠषीचा आश्रम सोडला होता. म्हणून या वैराग्यमार्गाची कसोटी सुध्दा घ्यावी म्हणजे स्वत: अनुभव घेऊन त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. म्हणून त्यांनी वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी उरुवेला येथे निरंजना नदीच्या काठी निर्जन आणि एकांत ठिकाण निश्चीत केले. कोलीय आणि शाक्य यांच्यात समेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला पाच परिव्राजकाने सांगितले होते ते सुध्दा याचठिकाणी वैराग्याचा अभ्यास करीत होते. वैराग्याच्या निरनिराळ्या पध्दतीचा अवलंब करुन ते इतक्या पराकोटीला गेले होते की, ते क्षणाक्षणाला यातना आणि वेदना घेऊनच जगत होते. अंगाचा थरकाप होईल इतक्या भयाण अरण्यात ते राहत होते. कडक थंडीत, कडक उन्हात, काळ्याकुट्‍ट आणि गुदमरवून टाकणार्‍या गर्द झाडीत राहत होते. जळलेल्या हाडाची ऊशी करुन स्मशानात झोपत होते. धान्याच्या एका दाण्यावर दिवसभर गुजराण करीत होते. तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश याचे स्वरुप इतके उग्र होते की, ते अत्यंत किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहचले होते. त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर साचून ते आपोआप पडत होते. त्यांचे पोट पाठीच्या कण्याला चिकटले होते. याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. अशा प्रकारची त्यांची तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते. सहा वर्षेनंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले की, त्यांना हालचाल सुध्दा करता येत नव्हती. इतकी कठोर तपश्‍चर्या करुनही त्यांना नवीन प्रकाश दिसला नाही. ज्या प्रश्‍नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऎहिक दु:खाविषयीच्या प्रश्‍नाचा त्याला यत्‍किंचितही उलगडा झाला नव्हता. त्यांनी विचार केला की, ज्यांची शक्‍ती नष्ट झाली, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला, ज्याचे मन अशांत झाले त्याला नवा प्रकाश कसा प्राप्‍त होईल ? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्‍तीनेच मिळु शकते. म्हणून वैराग्यमार्गाची कसोटी सोडून त्यांनी सुजाताने दिलेले अन्न भक्षण केले. तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश याचा त्याग केल्यामुळे त्यांचे सोबतचे पाच परिव्राजक रागाने त्यांना सोडून गेले.

सिध्दार्थ गौतम उरुवेला सोडून गयेला आले. तेथे पिंपळ्वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असता त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला.

नव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे असे त्यांनी मान्य केले. परंतू दु:ख कसे नाहिसे करावे ह्या प्रशानाचा विचार सांख्य तत्वज्ञानाने केला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्‍न विचारला की, “व्यक्‍तिमात्राला भोगाव्या लागणार्‍या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्‍नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्‍त कसे व्हायचे याचा शोध फ़क्‍त बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हा चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.

भगवान बुध्दांच्या काळात अनेक मतप्रणाली अस्तित्वात होत्या. ह्या मतप्रणाली साधारणत: दोन भागात विभागल्या जातात. एक उच्छेदवादी व दुसरे शाश्वतवादी. सर्व काही संपणारे आहे म्हणून खा, प्या आणि मजा करा अशी उच्छेदवादी विचारसरणी होती. आत्मा शाश्वत आहे म्हणून हे माझे, ते माझे असे शाश्वतवादी विचारसरणी होती. भगवान बुध्दांनी या दोन्हिही विचारसरणीला नाकारले.

भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक यांना सारनाथ येथे धम्माचा उपदेश केला व त्यानंतर त्यांचा धम्म संपुर्ण जगात पसरला.

भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, ‘जीवनाच्या आत्यंतिक असे दोन टोके म्हणजे खा, प्या आणि मजा करा, आणि सर्व वासना मारुन टाका. कारण ते पुनर्जन्माचे मुळ आहेत.’ यां दोन्हिंही टोकांना नाकारुन जो उपभोगाचा नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही असा मध्यम मार्ग त्यांनी स्विकारला. याच मध्यम मार्गाची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. तेव्हा हे मध्यम मार्ग दुसरे-तिसरे काही नसून चार आर्यसत्यच आहेत. हाच मार्ग मानव मुक्‍तीचा आहे. इश्वर, आत्मा वगैरे कालपनिक गोष्टीला स्थान न देता त्यांनी ‘माणूस आणि माणसाचे या जगातील नाते’ याला प्राध्यांन्य देऊन आपला धम्म सांगितला. म्हणूनच त्यांच्या धम्माला ‘एहि पस्सिको’ म्हणजे ‘या आणि प्रत्य्क्ष पाहा‘ असे म्हटले आहे.

याच सुत्तात ते पुढे म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनूष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.

भगवान बुध्दांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून तर आतापर्यंत आणि भविष्यात सुध्दा जे कोणी धम्म सांगतील ते दुसरे-तिसरे काही राहणार नसून ते चार आर्यसत्याचाच सार राहील असे ठामपणे म्हणावे लागेल. भगवान बुध्दांने याला उत्तम शरण असे म्हटले आहे.

भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेएकान्नव व एकशेब्यान्नवव्या गाथेत म्हणतात –

दु:ख दुक्खसमुप्पादं दुक्खस्स च अतिक्क्मं ।

अरियञ्चग्ङिकं मग्गं दुक्खूपसगामिनं ॥

एतं खो सरणं खेमं एतं सरण्मुत्तमं ।

एतं सरणमागम्म सब्बदुक्खा पमुच्चति ॥

याचा अर्थ, जो चार आर्यसत्यांना योग्य प्रकारे प्रज्ञेने पाहतो व दु:ख, दु:खाची उत्पत्ती, दु:खाचा विनाश व दु;खाचे उपशमन करणारा आर्य अष्टांगिक मार्ग याचे शरण ग्रहण करणे हेच कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरण आहे. या शरणाला ग्रहण करुन मनुष्य सर्व दु:खातून मुक्त होतो. परंतु यासाठी तुम्हीच प्रयत्‍न केले पाहिजे असे भगवान बुध्द म्हणतात-

तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता ।

याचा अर्थ, तुम्हीच प्रयत्‍न केले पाहिजे. तथागत केवळ मार्गदाता आहे.

म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या ‘बुध्दांने कोणते बदल केले?’ यां भागात ‘कार्याकारणभावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसुध्दांत भगवान बुध्दांनी मान्य केले.’ असे लिहिले आहे. कार्यकारणभावाचा म्हणजेच प्रतित्यसमुत्पादाचा हाच सिध्दांत म्हणजे चार आर्यसत्याचा अविष्कार होय. म्हणूनच दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्ये समजणे म्हणजेच भगवान बुध्दांचा धम्म समजणे असे म्हटल्या जाते.

तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “चार आर्यसत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे ? कारण हे चार आर्यसत्य बुध्दाच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.”

त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्दाच्या बाबतीत असा दृष्टिकोन बाळगणे चुकीचे आहे.

भगवान बुध्द जरी दु:खाचे अस्तित्व मान्य करीत असले तरी ते दुसर्‍या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. दु:खाचे निरसन करण्याचा मार्ग सुध्दा त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे, असे कसे म्हणता येईल ? भगवान बुध्दाच्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे.

जग आणि जीवन दु:खमय नाही तर जगात आणि जीवनात दु:ख आहे असा नवा विचार त्यांनी मांडला. या दु:खावर मात करता येते असे त्यांनी ठासून सांगितले. या दु:खावर मात करण्याचा उपायही त्यांनी सांगितला.

भगवान बुध्दाने सतत आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत भ्रमण करुन विपश्यना विद्येच्या माध्यमातून लोकांना दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. परिनामस्वरुपत: त्यांच्या जीवनकाळामध्ये हजारो गृहत्याग करणार्‍या भिक्खु आणि भिक्खुंनी अरहंत झालेत, निर्वाणपदा पोहचवून पुर्णत: दु;ख मुक्त झालेत. तसेच अन्य भिक्खु आणि भिक्खुंनीसहित लाखोच्या संख्येत गृहास्थी जीवन जगणारे लोकं सुध्दा सत्याचा साक्षात्कार होऊन स्त्रोतापन्न झालेत. दु:ख मुक्त झालेत. भगवान बुध्दाचा विपश्यना मार्ग या चार आर्यसत्याचा आधार घेऊन जगातील करोडो लोकांचे कल्याणाचा मार्ग प्रश्स्त करुन याच जीवनामध्ये प्रत्यक्ष दु:ख-विमुक्तीचा अनुभव करुन देत आहेत.

विपश्यना शिबीरामध्ये चित्ताला निर्मळ करुन शेवटच्या दिवशी मंगल मैत्रीचा अभ्यास केला जात असतो. ‘भवंतु सब्ब मंगलं’ चा मंगलकारी घोषाने संपुर्ण आसमंतात मंगल-घोषाचे तरंगच-तरंग जिकडे-तिकडे पसरत असतात

कोणी एखादा निष्णात डॉक्टर रोग्यांना सांगतो की, तुला अमुक रोग झाला आहे व त्यावर मी औषधी-उपचार करुन तुझा रोग बरा करु शकतो. तो रोगी त्यांच्या वैद्यकीय उपचाराने बरा होतो. मग त्या डॉक्टरला कोणी रोगवादी म्हणतील की निरोगवादी ? तसेच चार आर्यसत्याच्या माध्यमातून दु:खाने पिडित असलेल्या लोकांना दु:ख मुक्तीचा मार्ग सांगून त्यांना भगवान बुध्द याच जीवनामध्ये दु:ख मुक्त करतात अश्या भगवान बुध्दाला आणि त्यांच्या शास्त्रशुध्द तत्वज्ञानाला व शिकवणीला निराशावादी कसे म्हणता येईल ?

जो निराशावादी किंवा दु:खवादी असेल तो केवळ दु:खाचा प्रचार करेल. तो लोकांच्या सुखाची कामना करणार नाही. मात्र ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ अशा मैत्रीभावनेचे शिकवण देणारे भगवान बुध्द लोकांच्या सुखाची कामना करतात. गेल्या कित्येक वर्षे भगवान बुध्दाच्या विपश्यना साधनेच्या दूर असणारे लोकं भगवान बुध्द किती धम्मवादी, सुखवादी व मंगलवादी होते ते अशा लोकांना कसे कळणार ?

धम्मपदामध्ये सुख आणि दु:खाच्या बाबतीत खालील दोन आहेत. पहिले पद असे आहे-

मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोती वा।

ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥

याचा अर्थ अशुध्द चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याच्या मागे जसे गाडीला ओढणार्‍या बैलाच्या मागे त्या गाडीचे चाके येत असतात तसे दु;ख त्याच्या मागे येत असतात.

दुसरे पद असे आहे-

मनसा चे पसन्नेन, भासति वा करोती वा।

ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनि ॥

याचा अर्थ प्रसन्न चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो तेव्हा त्याची सावली जशी त्याचा पिच्छा सोडत नाही तसे सुख त्याच्या मागे येत असते.

स्पष्ट आहे की मलीन चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते दुष्कृत्येच असेल आणि दुष्कृत्याचे फळ नेहमी दु:खदच असते. त्याचमाणे निर्मळ चित्ताने जो कोणी व्यक्ती शरीर अथवा वाणीने कर्म करतो ते सत्कृत्येच असेल आणि सत्कृत्याचे फळ नेहमी सुखदच असते.

यापरुन धम्मपदामध्ये पहिल्या पदामध्ये दु:खाचे व दुसर्‍या पदामध्ये सुखाचे अशा दोन्हिही दु:ख आणि सुखाचे विवेचन केले आहे.

जर धम्मपद हा ग्रंथ संपुर्णपणे वाचला तर त्यात धम्माच्या बाबतीत भगवान बुध्दाच्या शिकवणूकीचे निरनिराळ्या विषयावर २६ वग्गाचे संकलन केलेले दिसते. यामध्ये एक सुख वग्ग आहे. परंतु त्यात दु:खाचा एकही वग्ग नाही. म्हणून. भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे कसे म्हणता येईल ?

भगवान बुध्दाने जसे दु:खाबाबत चर्चा केली तसे सुखाबाबत सुध्दा केली आहे. जेथे दु:खाबाबत चर्चा केली तेथे दु:खाचे कारणे प्रकाशात आणून ते दूर करण्यासाठी उत्साहित केले आहे. तसेच जेथे सुखाबाबत चर्चा केली तेथे त्याचे कारणे स्पष्ट करुन त्याचे सवंर्धन करण्यासाठी उत्साहित केले आहे. त्यामुळे भगवान बुध्दाचा धम्म निराशावादी व दु:खवादी आहे असे म्हणने चुकीचे ठरेल.

भगवान बुध्दाचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दु:खाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे. कारण मानवी दु:खाचा अंत करण्याचा मार्ग ते दाखवितात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, दारिद्र्य हे दु:खाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे.

सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश ह्या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते.

भगवान बुध्दांनी एखाद्या कुशल वैद्याप्रमाणे चार आर्यसत्याचे मुलभूत विश्‍लेषण केले आहे. त्यांनी प्रथम रोगाचे निदान करुन त्याचे कारण जाणले आहे. तो रोग कसा निर्माण होतो, हे त्यांनी जाणले आहे. नंतर तो रोग नष्ट करण्याचे निश्चित केले व शेवटी त्यावर उपाय सांगितला. दु:ख हा रोग आहे. तृष्णा हे त्या रोगाचे कारण आहे या रोगावर उपाय करता येतो. आर्यअष्टांगिक मार्गाने हा रोग कायमचा बरा करता येतो, हे सुत्र भगवान बुध्दांनी मांडले. म्हणूनच त्यांना अप्रतिम वैद्य आणि कुशल शल्यकार असे म्हटले जाते.

आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्‍यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो.

प्रकरण चवथे - पहिले आर्यसत्य - दु:ख

दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. म्हणून भगवान बुध्दांची शिकवण दु:खाच्या अस्तित्वापासून सुरु होते. जगातील सर्व प्राणिमात्राना जोडणारा एकच दुवा आहे, आणि तो म्हणजे `दु:ख’. दु:ख आर्यसत्य न सजल्यामूळे अनेकांनी अज्ञानामुळे देव, आत्मा, परमात्मा, ब्रम्ह, ईत्यादी काल्पनिक गोष्टीवर आपल्या तत्वज्ञानाचा डोलारा उभा केला आहे. परंतू हे तत्वज्ञान वैज्ञानीक कसोटीवर उतरु शकत नाही. जगातील सर्व प्राणिमात्राना दु:ख प्रत्यक्ष भोगावे लागते. म्हणून प्रत्येक जण दु:खापासून मुक्‍त होवून सुख प्राप्तीसाठी धडपडत असतो.

भगवान बुध्द आपल्या शिकवणीत म्हणतात, “जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे. आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. रडणे-ऒरडणे, पीडित होणे, चिंतित होणे, त्रस्त होणे हे सर्व दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे.. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते.

भगवान बुध्दाने नैसर्गिक कारणांमुळे निर्माण झालेल्या दु:खाची चर्चा केली नाही. त्यांनी सामाजिक कारणांमुळे उत्पन्न होणार्‍या दु:खाची चर्चा केली. वेगवेगळ्या वर्गातील जाती व गटांमधील कलह, सामाजिक विषमता, अन्याय, संघर्ष यामूळे दु:ख निर्माण होते असे त्यांनी सागितले.

दु:ख हा शब्द शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिने वापरला आहे. जन्म, व्याधी, आजारपण, म्हातारपण हे शारिरीक दु:ख आहे. इच्छा़ची पुर्तता न होणे हे मानसिक दु:ख आहे. पांच उपादान स्कंध हे आध्यात्मिक दु:ख आहे. यात व्यथा, भोग, ताप, त्रास, कष्ट, क्लेश, वैफल्य, त्रागा, पीडा, कारुण्य, विषाद, अशांतता, असमधानकारता, शोषण, चिंता, निराशा ईत्यादि अनेक दु:खद छटांचा समावेश होतो. शोक करणे, रडणे, ओरडणे, विलाप करणे, चिंताग्रस्त होणे, त्रस्त होणे हे निरनिराळ्या दु:खाचे अविष्कार आहेत. अप्रियांचा संयोग व प्रियांचा वियोग हा इच्छापूर्ती न झाल्यामुळे होणार्‍या मानसिक दु:खाचा विस्तार आहे. व्यक्‍तीनूसार आणि संदर्भानूसार दु:खाचे हे वर्गिकरण बदलत असते. त्यामुळे ते ठराविक आहेत असे म्हणता येत नाहीत.

मानवाने मानवाची केलेली पिळवणूक आणि शोषण यामुळे निर्माण होणारे दु:ख याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लक्ष वेधले आहे

प्राणिमात्रांच्या उत्क्रांतीत शारीरिक दु:ख हे खालच्या पहिल्या स्तराचे दु:ख आहे. त्याच्या वरच्या दूसर्‍या स्तरावरचे दु:ख म्हणजे मानसिक दु:ख होय. जीवनाविषयीच्या आपल्या कल्पन्ना आणि जीवनातील वास्तवता यांच्यात तफावत आली म्हणजे आलेल्या निराशेतून मानसिक दु:ख निर्माण होते. तिसर्‍या स्तरावरील दु:खामध्ये आपण आपल्या नाशवंत शरीराची किंवा आपल्या क्षणभंगुर जीवनाची फारशी काळजी करीत नसतो. आपले दु:ख जास्तीत जास्त सर्वव्यापी बनते. अशावेळी आपण दुसर्‍यांचा दु:खात सहभागी होत असतो. आतापर्यंत आपण स्वत:लाच जास्त महत्व देत आलो असतो. आपण आपल्या अहंपणामुळे स्वत:वर बंधन ओढवून घेतले असते. त्या अहंपणामध्ये आपण गुरफटून गेल्यामुळे आपण आपला विकास खुंटवून टाकलेला असतो. असे हे दु:खाचे सर्वसाधारणपणे तिन स्तर आहेत.

जगात दु:ख आहे हे सर्वकालीन सत्य आहे. हेच सत्य भगवान बुध्दाने पहिल्या आर्यसत्यात सांगितले आहे. दु:खाचा पगडा सर्व जीवनावर असतो. सर्व जग दु:खाने पिडित आहे. जगातील कोणताही प्राणी दु:खापासून मुक्‍त नाही. जगाकडे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहणारा कोणताही सुज्ञ व्यक्‍ती हे नाकारु शकत नाही. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे याचा अर्थ जगातील सुखाचे अथवा आनंदाचे अस्तित्व नाकारणे असा होत नाही. दु:खाचे अस्तित्व प्रतिपादन करतांना भगवान बुध्दांनी सुखाचे अथवा आनंदाचे अस्तित्व कधिही नाकारले नाही हे त्यांनी महाली लिच्छवीच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सांगितले आहे. म्हणून भगवान बुध्दांचा धम्म निराशावादी आहे असे कदापिही म्हणता येणार नाही.

मनुष्यप्राणी इंद्रियाद्वारे त्या त्या विषयाकडे आनंद व सुख उपभोगण्यासाठी आकर्षित होवून त्यात रममाण होतात. परंतु तो आनंद व सुख चिरकाल टिकणारा ठरत नाही. तेव्हा तो बव्हंशी दु:खी व निराश होतो. मनुष्याला तोच-तोचपणा आवडत नाही. त्याला जीवनात विविधता पाहिजे असते. ज्याप्रमाणे गवत खाणारे प्राणी नेहमी ताज्या कुरणाकडे आकर्षित होतात, तसेच मानवप्राणी सुध्दा आनंद व सुख नव-नवीन गोष्टीकडे वळत असतात. पण हा आनंद व सुख सुध्दा क्षणैक असतो. म्हणून प्रत्येक सुखकारक गोष्टीच्या मागे दु;ख असते. ही एक दु:खाची पहिली अवस्था आहे.

अशातर्‍हेने मिळविलेले आनंद व सुख क्षणैक ठरत असते. परंतु ह्या वस्तुस्थितीची जाणीव माणसाला नसते. मात्र जेव्हा तो या आनंद व सुखापासून हिरावल्या जातो तेव्हा तो दु:खी व निराश होतो. तो आपल्या मनाचा तोल घालवून बसतो. ही एक दु:खाची दूसरी अवस्था आहे. मनुष्यप्राण्याला या दोन्हिही प्रकारच्या मानसिक अवस्थांना तोंड द्यावे लागते.

पण जो मनुष्य मुक्‍त झाला आहे तो सुख-दु:खांना वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. जीवनात कोणताही बरा-वाईट प्रसंग आला असता त्याचे चित्त विचलीत होत नाही. अशा बर्‍या-वाईट प्रसंगाकडे तो समानतेच्या भावनेने पाहत असतो. तो सुखाने बेहोष होत नाही किंवा दु:खाने वेडा-पीसा होत नाही. तो कधिही चिंताग्रस्त होत नाही. तो चिंतेतून मुक्‍त झालेला असतो.

जगातील सर्व संस्कारीत वस्तू सतत बदलत असतात. त्या अस्तित्वात येतात आणि नाहिसेही होत असतात. ह्या संस्कारचक्रातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रत्येकांचे ह्या जगातील अस्तित्व अगदी थोड्या काळापूरतेच राहात असते. जीवनातील ह्या क्षणभंगूरतेमुळे खर्‍या अर्थाने जगात कायमचे सुखकारक असे काहिच नाही. जीवनात सुख आहे परंतु ते क्षणभंगूर आहे. मनूष्याला अनुभवास येणारे सर्व सुख आणि आनंद लवकरच अस्पष्ट होतात आणि कालांतराने ते लोप पावतात.

मनुष्यप्राण्याचे सर्व घटक म्हणजे नामरुप, विज्ञान, संज्ञा, वेदना, व संस्कार तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे पंचस्कंधात सामावलेले आहेत. पंचस्कंधाशिवाय मनुष्यप्राण्यात दुसरा कोणताच घटक अस्तित्वात नाही. असा कोणताच घटक नाही की जो पंचस्कंधात सामावलेला नाही. सर्व पंचस्कंध सतत बदलणारे आहेत. परिवर्तनशील आहेत. म्हणूनच दु:ख आर्यसत्य स्पष्ट करुन सांगतांना भगवान बुध्द म्हणतात, हे पांच उपादानस्कंध थोडक्यात दु:खमय आहे. दु:ख हे पांच उपादानस्कंधापेक्षा वेगळे नाहीत. पांच उपादानस्कंध आणि दु:ख एकच आहेत. अनित्य आहे. जे अनित्य आहे ते दु:ख आहे.

प्रकरण पांचवे - दुसरे आर्यसत्य - दु:ख समुदय

दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. दु:ख समुदय म्हणजे दु:खाचे कारण. मनुष्याला दु:ख कां होते ? त्याला दु:ख कां भोगावे लागते ? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागिल जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.

परंतू दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामूळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते.

तृष्णा

दु:ख निर्मितीच्या मागे तृष्णा हे एक कारण आहे. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हाच त्या गोष्टीविषयीची आसक्ती वाटत असते. ज्या गोष्टीविषयीची आपणास अनुभव नाही त्या गोष्टीविषयीची सहसा तृष्णा उत्पन्न होत नाही. एखाद्या रुपावर आपण आसक्त होतो तेव्हा साहजिकच सुखवेदना निर्माण होतात. सुखवेदनाची आसक्ती झाली की नैसर्गिकरीत्या त्या सुखवेदनाची निर्मिती करणार्‍या रुपाची आसक्ती होते. अशा रितीने वेदनेमुळे तृष्णा निर्माण होते. जेव्हा सुख निर्माण होते तेव्हा अधिकाधीक सुख मिळण्यासाठी पुन: पुन्हा तृष्णा निर्माण होते. म्हणून तीला पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्‍त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा असे म्हणतात. हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. तृष्णा म्हणजे तहान. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखादी गोष्ट प्राप्‍त कराविशी वाटते, तेव्हा त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, अशा लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात.

लोभ

लोभ म्हणजेच अपुरेपणा, हावरटपणा आणि अतृपता दर्षविणारी माणसाच्या मनाची स्थिती होय. लोभी माणूस कधिही तृप्‍त होत नाही. लोभामध्ये माणसाची आवड, इच्छा, ओढ, लालसा, हाव, मालकीहक्क, किर्तीलोभ, अपत्यलोभ, संपत्तीलोभ इत्यादी भावणा दिसून येते. लोभातून दु:ख निर्माण होते. लोभातून भय निर्माण होते. अनिर्बन्ध लोभाने आणि पूर्वग्रहकलुषित मनाने किंवा मिथ्यादृष्टीने जर एखादी गोष्ट केली, तर तो लोभ लवकर जात नाही. उदाहरणार्थ जर एखाद्या वरिष्ट वर्गाने खालच्या वर्गावर स्वत:चे हित जोपासण्यासाठी वर्चस्व प्रथापित करण्याचा मोह झाला असेल तर त्यांचा मोह लवकर सुटणार नाही. त्या प्रयत्‍नांत त्यांना अनेकदा अपशय जरी आले तरी त्यांचा लोभ आणि मोह कमी होणार नाही. उलट त्याची तिव्रता विफलतेतून आणि निराशेतून आणखी वाढत जाईल. अशा मिथ्यादृष्टी असणार्‍या लोभाला मान्यता देणार्‍या तत्वांना नाकारले तरच तो लोभ नष्ट होऊ शकतो. लोभापासून पूर्णपणे विमुक्‍त झाल्याने दु:ख आणि भय यापासून मुक्‍तता लाभते.

लोभ आसक्‍ती निर्माण करतो आणि आसक्‍ती चित्ताला गुलाम करतो. आसक्‍तीमूळे दु:ख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्‍तीच्या बंधनातून मुक्‍त आहे, त्याला दु:ख नाही भय नाही. जो कामभोग अथवा कामुकतेच्या बंधनातून मुक्‍त आहे, त्याला दु:ख नाही व भय नाही.

द्वेष

जेव्हा एखाद्यी व्यक्‍ती स्व:ताचा हेतू साध्य न झाल्यामुळे, किवा स्व:ताची अस्मिता दुखावली गेल्यामुळे अंतर्गत असमाधानी असतो, तेव्हा तो आपला रोष ईतरांवर काढत असतो. यातूनच द्वेष किवा तिरस्कार निर्माण होऊ शकतो. द्वेषामध्ये तिटकारा, तिरस्कार, राग, चीड, असंतोष, सुड यासारख्या मानसिक प्रवृती कार्य करित असतात. यातूनच अपेक्षाभंग, उदासिनता, निराशा, धास्ती, भय यासारख्या वृती मनामध्ये डोकावतात. वस्तुमात्राच्या अस्थिरतेमुळे, असुरक्षेमुळे, आणि असमाधानकारकतेमुळे अशा वृती उत्पन्न होत असतात. वस्तुमात्राचे योग्य आकलन न झाल्यामुळे मनाची अशी अवस्था होत असते. द्वेषामुळे व्यक्‍तीमध्ये व समाजामध्ये दु:ख निर्माण होते.

द्वेषाबरोबर मिथ्यादृष्टीचा मोहसुध्दा असेल तर तो द्वेषाला अधिकच वाढवतो. उदाहरणार्थ मिथ्यादृष्टीने काही वर्ण, जाती-जमाती किंवा धर्म-संप्रदाय सामाजीक, धार्मिक व नैतिक दृष्टया तिरस्करणीय ठरविले तर त्यामुळे उत्पन्न होणारा द्वेष फार जहाल स्वरुप धारण करु शकते. जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा व भारतामध्ये दलित वर्गांचा झालेला छळ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

मोह

मोह म्हणजे अज्ञानाने, गोंधळून टाकणारी वैफल्याची आणि असहायतेची मानसिक स्थिती होय. मोहाच्या हट्टापायी चुकीच्या मतप्रणालीवर अनाठायी विश्वास ठेऊन त्याचे विपरीत परिणाम मनूष्याला भोगावे लागतात. मोहामुळे लोभ आणि द्वेश उत्पन्न होते. मूर्खपणा, कमीबुध्दी, गोंधळ, चार आर्यसत्याविषयी अज्ञान, पूर्वग्रहकलुषितपणा, कल्पनासृष्टीतील हटवाद, जहालमतवाद, मिथ्यादृष्टी, अहंभाव इत्यादी कमी-अधिक तीव्रतेच्या वृती मोहामध्ये समावलेले असतात. लौकिक आणि कर्माच्या दृष्टीने मोह असणे हा फार मोठा दोष आहे. मोहामुळे जर एखादे कर्म केले तर त्या कर्माच्या परिणामापासून त्या माणसाची सुटका होण्यास वेळ लागतो.

मोह असल्याशिवाय लोभ किंवा द्वेष उत्पन्न होऊ शकत नाही. भगवान बुध्द म्हणतात की, ‘सर्व अकुशल धम्माचे (स्थितीचे) मूळ मोह आहे, ते मोहात एककेंद्रित होतात आणि मोह नष्ट केला म्हणजे सर्व अकुशल धम्मसुध्दा नष्ट होते. मोह आंधळेपणाने, अजाणतेपणे स्विकारले जात असते. त्यात वास्तवता व सम्यकदृष्टीचा अभाव असतो. थोडक्यात सर्व अकुशल कर्माचे मूळ म्हणजे मोह होय. मोहामुळे म्हणजे अज्ञानामुळे माणसाला मिथ्यादृष्टी निर्माण होते. यामुळे त्याला शाश्वतवादी अथवा उच्छेदवादाची भवतृष्णा अथवा विभवतृष्णा होत असते.

तृष्णा तिन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.

कामतृष्णा

कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्‍तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्‍या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनूष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.

भवतृष्णा

भवतृष्णा म्हणजे दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे.शंभर वर्षे जगूनही मनूष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “शंभर वर्षे शेळी हो‍ऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा ! ”

विभवतृष्णा

विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा,प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.

प्रकरण सहावे - प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत

दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुध्द धम्माचे मूलभूत सिध्दांत आहेत. हे चारही सिध्दांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिध्दांत ईतका महत्वाचा आहे की, जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो असे भगवान बुध्द म्हणतात. या सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपुर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे. जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादिकाळपासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे. अशा या जन्म आणि मरणाच्या रहस्यावर भगवान बुध्दाने प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताच्या आधारे प्रकाश टाकून भवचक्राच्या प्रवृती व निवृतीच्या मुळाशी असलेल्या कारणाचे दिग्दर्शन केले आहे.

भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद म्हणजे काय ते ‘मझिमनिकायातील चूलसकुलदायिसुत्तात’ असे सांगितले –

‘इमस्मिं सति इदं होति ।

इमस्सुप्पादा इदं उपज्जति ॥

इमस्मिंअसति इदं न होति ।

इमस्स निरोधा इदं निरुज्जति ॥’

‘ह्याच्या होण्यामुळे हे होत असते.

ह्याच्या न होण्यामुळे हे होत नसते.

ह्याचा उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते.

ह्याचा निरोध केल्याने.

ह्याचा निरोध होत असतो.’

पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित यांनी सारीपुत्तांना भगवान बुध्दांचा धम्म संक्षेपाने सांगितला-

‘ये धम्मा हेतुप्पभवा, हेतुं तेसं तथागतो आह ।

तेसंच यो निरोधो, एवं वादी महासमणो ॥’

‘जी दु:खे, ज्या गोष्टी (धम्म) कारणांपासून उत्पन्न होतात, त्यांची कारणे तथागतांनी सांगितली आहेत आणि त्यांचा निरोध कसा करावा हे त्यांनी सांगितले आहे. हेच महाश्रमणांचे मत आहे.’

यावरुन हे स्पष्ट होते की, अगदी सुरुवातीपासूनच भगवान बुध्दांच्या धम्माचा पाया प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेला होता.

संयुक्‍त निकायात नमुद केल्याप्रमाणे भगवान बुध्द भिख्कु आनंदाशी संवाद करीत असतांना म्हणाले की, ‘प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत फार गंभ्रीर आहे. गूढ आहे. या धर्माला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्य धाग्याच्या गुंडीसारखी, गाठी पडलेल्य दोरीसारखी आणि गोळा झालेल्या मुंजाच्या गवतासारखी होऊन, अपायात पडून दुर्गतीला प्राप्‍त होत आहे.’

महापधान सुत्तात भगवान बुध्द म्हणतात की, ‘आसक्‍तीत पडलेल्या, आसक्‍तीत रममाण असलेल्या आणि आसक्‍तीत आनंद मानणार्‍या सामान्य लोकांसाठी हे कठीन आहे की कार्यकारणासंबंधी प्रतित्यसमुत्पादाला ते समजून घेतील.’ सर्वसामान्य लोक ईश्वर, देवदेवता, दैववाद, कर्मकांड, आत्मा इत्यादी संबंधीत मिथ्यादृष्टीत गूतले होते. त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत त्यांना समजेल की नाही याबाबत भगवान बुध्दांना शंका वाटत होती. परंतु महाकारुणिकांच्या असिम मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या ब्रम्हविहाराच्या भावनेने त्यांना प्रवृत केले की जगातील काहीतरी लोकं हा धम्म समजू शकतील. त्यानंतरच त्यांनी आपल्या सिध्दांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला.

प्रतित्य म्हणजे प्रत्यय किंवा कारण आणि समुत्पाद म्हणजे उत्पत्ती. अर्थात प्रतित्यसमुत्पाद म्हणजे हेतूमुळे किंवा कारणामुळे कार्याची उत्पत्ती होणे. ह्याच्या उत्पन होण्यामुळे हे उत्पन होत असते. यालाच कार्यकारणभाव (Cause and effect) असेही म्हटले जाते. प्रतित्यसमुत्पादाला प्रत्ययाकार किंवा पच्चयाकार निदान असेही म्हणतात. त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता यांचेशी आहे. कोणताही पदार्थ शाश्वत नाही. सव संस्कारीत पदार्थ अनित्य आहेत, क्षेणैक आहेत आणि हेतुप्रत्ययजनित आहेत. प्रतित्यसमुत्पादाला ‘मध्यमावर्ग’ असेही म्हणतात. बुध्दधम्मात शाश्वत दृष्टी व उच्छेद दृष्टी यांना टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे. महास्थविर बुध्दघोषांनी ‘प्रतीत्य’ शब्दात शाश्वत दृष्टी आणि ‘समुत्पाद’ शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडण केले आहे असे सांगून प्रतित्यसमुत्पाद मध्यममार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले आहे.

आचार्य नागार्जुन यांनी प्रतित्यसमुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे. विग्रहव्यावर्तनीमध्ये नागार्जुन म्हणतात की, ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थाला सुध्दा जाणले आहे. कारण ज्यांनी शून्यतेला जाणले आहे, त्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे. त्याने चार आर्यसत्यालाही जाणले आहे.

भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लाऊन मानवाच्या दु:खाच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडली आहे. म्हणून त्यांचा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत हा एक अलौकीक शोध आहे. त्यावेळी जी समाजरचना होती, जी विचारधारा प्रचलीत होती, त्या प्रवाहाच्या विरोधात प्रतित्यसमुत्पादा द्वारे त्यांनी आपल्या एका नवीन धम्माची आणी तत्वज्ञानाची प्रतिष्ठापना केली.

प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत केवळ दु:खापुरताच मर्यादित नाही, तर तो विश्वातील सर्व गोष्टींना लागू पडतो.

याच सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने सृष्टीचा निर्माता म्हणून इश्वराला नाकारले. तसेच ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुध्दा नाकारले. कोणीही जग शून्यातून निर्माण करु शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते. त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर, देव वगैरे सर्व कल्पना खोट्या आहे. सर्व विश्व प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत बुध्दाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. बुध्दाच्या मते या जगात खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे, असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्व गोष्टीमध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट गोष्टीचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते. भगवान बुध्दानी ईश्वराचे स्थान `सदाचार व नितिला ’ दिले आहे.

भगवान बुध्दाने पुनर्जन्माला अवतार (Incarnation) म्हणून नाही तर पुनर्निमिर्ती म्हणून मानले. त्यानी शरीराचे चार घटक म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे पुनर्जन्म मानले, आत्म्याचे नाही.

प्रतित्यसमुत्पाद सिध्दांतात भगवान बुध्दाने दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा करता येईल याचा शोध घेतला. प्रतित्यसमुत्पादाचा शोध लावल्यामूळे सिध्दार्थ गौतमाला बुध्दत्व प्राप्‍त झाले. ज्ञानप्राप्‍तीच्या रात्री पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रहरी भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पादाचाच विचार केला.

प्रतित्यसमुत्पाद हा बारा कड्‍याचा सिध्दांत आहे. ज्या प्रकारे एखाद्या चक्राला अनेक आरे असतात आणि ते चक्र आर्‍यासहित गोलाकार फिरत राहते. त्याचप्रमाणे हे भवचक्र बारा आर्‍यांचे बणले असून ते अखंडपणे फिरत राहते.

सिध्दांतानुसार अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरुप (मन आणि शरीर), नामरुपामुळे षडायतन (सहा ईद्रीये), षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान (चिकटून राहणे), उपादानामुळे भव (होणे), भवमुळे जाती (जन्म), जातीमुळे जरा (वार्धक्य), मरण, शोक उत्पन्न होतात. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दु:खाचा उगम होणार्‍या बारा कड्यांना अनुलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे. .

तसेच अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरुपाचा निरोध होतो. नामरुपाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो. वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध होतो. तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध होतो. उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध होतो. भवाच्या निरोधाने जातीचा निरोध होतो. जातीच्या निरोधाने जरा, मरण, शोक याचा निरोध होतो. याप्रमाणे दु:खाचा निरोध होतो. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते जरा, मरण पर्यंत दु:खाचा निरोध करणार्‍या बारा कड्यांना प्रतिलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा निरोध कसा होतो हे प्रतिलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.

दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा होतो याची कारणमिमांसा प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार भगवान बुध्दाने याप्रमाणे समजावून सांगितला आहे.

प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत सांगतांना अविद्येपासून सुरुवात केली आहे. परंतु अविद्या हे दु:ख निर्मितीचे मूळ कारण आहे असे म्हणता येणार नाही. जगातील प्रत्येक गोष्टीचा उगम दुसर्‍या कोणत्या तरी समुत्पादाच्या गोष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार जगात कोणतेच मूळ कारण असु शकत नाही, अविद्या म्हणजे जग जसे तसे न पाहणे, म्हणजेच दु:ख आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान नसणे. ज्याला आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान आहे. त्याच्याकडून संस्कार उत्पन्न होणार नाही, त्याच्यात तृष्णा उत्पन्न होणार नाही. म्हणजेच तो दु:खातून मुक्त होईल.

कोणत्याही गोष्टी प्रत्ययाशिवाय म्हणजे कारणाशिवाय होत नसते. कारणामुळे जे कार्य होते ते आपल्या परीने दुस‍र्‍या कार्याचे कारण होते. आणि ते दुसरे कार्य आपल्या परीने तीस‍र्‍या कार्याचे कारण होते. अशा तर्‍हेने कार्यकारन भावाचे चक्र अव्याहतपणे चालू असते. वस्तुमात्रांतील परस्परसंबंध हे प्रतित्यसमुत्पादाचे मुळ स्वरुप आहे. कोणतीही वस्तु स्वयंसिध्द नसते. तिचे अस्तित्व संबंधजन्य असते. यावरुन असे लक्षात येईल की, जगात कोणत्याही गोष्टीला पहिले कारण नसते. कारण प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या कारणामुळे अस्तित्वात आलेले असते. शिवाय कार्याला एकच कारण असते असेही नाही, तर बहुतांश वेळेला अनेक कारणांच्यामुळे कार्य घडत असते. म्हणून प्रतित्यसमुत्पादाचे हे सिध्दांत नीट समजल्यावर असे लक्षात येईल की, जगात शून्यातून काहीच निर्माण होत नाही. त्यामुळे ईश्वराला शून्यातून जग निर्माण करणे शक्य नाही. प्रत्येक कार्य हे कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालविणार्‍या ईश्वराचे काहीच काम नाही. जर ईश्वर असेलच तर तोही कोणत्यातरी कारणामुळे उत्पन्न झाला असला पाहिजे. कारण तो स्वयंभू असणे शक्य नाही. कार्यकारण भावामुळे जगात चमत्काराला वाव नाही. म्हणून बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला काहीच स्थान नाही. बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला मानले जात नाही. ब्रम्ह हे विश्वनुर्मितीचे कारण असू शकत नाही. बी पासून झाड उत्पन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येत असतात. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा, देव असे कोणीही अस्तित्वात असू शकत नाही. आपण केलेया कृत्याचे बरे वाईट परिणाम घडत असतात. थोडक्यात म्हणजे सर्व विश्वच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

बौध्द धम्मात भवचक्र किंवा संसारचक्र, कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दु:ख आर्यसत्याशी जोडला आहे.